पुण्यात मुलींची संख्या घटली; सहा महिन्यांत 25 ने घट!

0

पुणे : पुण्यात मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत असून, सहा महिन्यांत तब्बल 25 मुलींची घट नोंदविली गेली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुण्यात दरहजारी 909 मुलींची संख्या असून, त्यात सातत्याने घट होत आहे. 2012 मध्ये 888 वरून ती 939 झाली होती. 2014 मध्ये थोडीशी घट होत ती 933 झाली. 2015 मध्ये 925 आणि 2017 मध्ये 934 असताना ती आता 909 झाली आहे. अशाच प्रकारे मुलींच्या जन्मदरात घट होत राहिली तर भविष्यात मुलांना मुली मिळणे कठीण होत जाणार आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत असतानाही मुलींच्या संख्येत घट होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

लिंगनिदान चाचणीमुळे घटली संख्या
वैद्यकीय क्षेत्रात पुरेशी जनजागृती करण्यात आली आहे. तसेच, लिंगनिदान न करण्याबाबतही सूचविण्यात आले आहे. यासंदर्भात असलेल्या कायद्याचीही अमलबजावणी केली जात आहे. तरीही मुलींचा जन्मदर घटत असल्याने आरोग्य विभागाची काळजी वाढली आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, 2015-16मध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर हे 991 इतके होते. म्हणजे हजार पुरुषांमागे 991 इतक्या स्त्रिया होत्या. त्यात महाराष्ट्रात हे प्रमाण 952 इतके होते. तर पुणे जिल्ह्यात 953 इतके होते. 2011 मध्ये या प्रमाणात प्रचंड घसरण झाली. ते 883वर आले. 2011 आणि 2014 मध्ये मुलींची संख्या झपाट्याने कमी झाली. राज्यात स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायदा आहे. त्याची सक्तीने अमलबजावणीही सुरु आहे. तरीही काही ठिकाणी चोरून लिंगनिदान होत असल्याने मुलींच्या जन्माचा दर घटला असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

2012 पासून सातत्याने घट सुरु
पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुणे शहरात स्त्री-पुरुष गुणोत्तर हे 2012 मध्ये वाढले होते. 2011 या वर्षात 888 इतके असलेले हे प्रमाण 939 वर गेले होते. तर 2013 मध्ये किंचितशी घट नोंदवली गेली. ते 933 वर आले. 2014 मध्ये त्यात वाढ होऊन 937 इतके झाले. तर 2016 मध्ये घट होऊन 925 इतके झाले. 2017 मध्ये हे प्रमाण 934 इतके असताना गेल्या सहा महिन्यांत त्यात पुन्हा 25 ने घट होऊन ते आता 909 इतके झाले आहे. ही खरे तर चिंतास्पद बाब आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी सरकारी रुग्णालयांसह शहरातील विविध रुग्णालये व प्रसुतीगृहांतून गोळा केलेली आहे. लिंग निदान करणे तसेच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी उपाय योजूनदेखील मुलींचा जन्मदर घटत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.