पुण्यात मुल्यवर्धीत शिक्षण उपक्रम

0

पुणे । राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुल्यवर्धीत शिक्षण कार्यक्रम राबविण्यचा निर्णय घेतला त्यानुसार 2017 ते 18 या शैक्षणिक वर्षात मुंबई वगळता 35 जिल्ह्यातील 107 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये प्रायोगीक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मूल्यशिक्षणाला पूरक मूल्यवर्धन या कार्यक्रमाची अंमलबजावणी गेल्या वर्षापासून राज्यात प्रायोगिक स्वरुपात करण्यात येत होती. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि अधिकार्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निष्कर्ष काढण्यात आले.

मुलांना कार्य आणि कृती पुस्तकांचे वाटप
गट चर्चा, जोडीचर्चा, सहयोगी खेळ यासारख्या विद्यार्थी केंद्रित बालस्नेही व आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे या उपक्रमातून दिले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सक्रिय भावना निर्माण करणे, मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. न्याय स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांची जोपासना करणारा नागरीक शालेय शिक्षण पद्धतीतून घडविण्यासाठी हा मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे मूल्यशिक्षणाचे धडे थेट अभ्यासक्रमाशी निगडीत करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांनी समाजात, घरी, बाहेर, मोठ्या व्यक्तींशी कसे वागायचे, कोणतेही काम कसे करावे यासंदर्भात सहजशिक्षण देण्यासंदर्भात कृती पुस्तिका, कार्य पुस्तिका मुलांना देण्यात येत आहेत.

शाळांमध्ये गमंतीशीर तसेच आनंददायी वातावरणातून विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, यासाठी हा उपक्रम जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये राबविला जात आहे.
-विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जि.प.

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, हवेली, पुरंदर, शिरुर, बारामती, खेड या तालुक्यांमध्ये काही पहिले ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळांमध्ये हे धडे दिले जात आहेत.
-विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, जि.प.