पुण्यात यशस्वी ठरले पहिले हार्ट ट्रान्सप्लांट

0

पुणे : सोलापूरच्या एका 15 वर्षांच्या मुलाचे हृदय तीन वर्षापासून कार्डिओमायोपॅथी या आजाराने पीडित असलेल्या 49 वर्षांच्या महिलेला यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट करण्यात आले. पुण्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया रूबी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. मुलाचे यकृत आणि मुत्रपिंडदेखील दोन रूग्णांना दान करण्यात आले.

सोलापुरात 14 वर्षीय शिवपार्थ शिवशंकर कोळी या मुलाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. मुलगा ब्रेन डेड झाल्याचं कळताच शिवपार्थच्या वडिलांनी त्याचे अवयव दान करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. शिवपार्थचं हृदय पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमधील रुग्णाला दान करण्यात आलं. एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं हृदय पाठवण्यात आलं. परंतु खाजगी दवाखान्यात अवयव काढण्यास मान्यता नसल्याने अश्‍विनी रूरल मेडिकल कॉलेजमध्ये मुलाचे हृदय काढण्यात आले.

मूळची सांगोला येथील महिला गेल्या तीन वर्षांपासून कार्डिओमायोपॅथी नावाच्या आजाराने ग्रस्त होती. तिला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून ती पुण्यात वास्तव्यास हेती. अखेर त्या मुलाच्या रूपाने तिची प्रतिक्षा संपली. रविवारी तिच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकाराची शस्त्रक्रिया मुंबई, औंरगाबादमध्ये पार पडली आहे, मात्र पुण्यात प्रथम अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मुलाचे हृदय काढण्यासाठी पुण्यातून रूबी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. मनोज दुराईराज तसेच भूलतज्ञ डॉ. कौस्तुभ चव्हाण यांचे पथक पाठविण्यात आले होते. त्या पथकाने मुलाचे हृदय काढले व हृदय घेऊन हे पथक लोहगाव विमानतळावर 6 वाजून 24 मिनिटांनी पोहोचले. वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉरद्वारे विमानतळ ते हॉस्पिटलपर्यंत अवघ्या सहा मिनिटात हृदय पोहचले. सुमारे साडेतीन तासानंतर महिलेवर हार्ट ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन पूर्ण झाल्याची माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजीव पठारे यांनी दिली. डॉ. जगदीश हिरमेठ, डॉ. मनोज दुराईराज, डॉ. चंद्रशेखर मखले डॉ. आषिष खनिजो, भूलतज्ञ डॉ. विकास साहू यांनी हे ऑपरेशन यशस्वी केले.

चौघांना जीवदान
15 वर्षाच्या ब्रेनडेट मुलाच्या हृदयाशिवाय एक यकृत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील रूग्णाला तर एक हडपसरच्या नोबल हॉस्पिटलला आणि सोलापूरच्या अश्विनी मेडिकल कॉलेजला प्रत्येकी एक मूत्रपिंड देण्यात आले आहे.

पुण्यात हार्ट ट्रान्सप्लांटची सुविधा
शहरात विविध अवयवांचे प्रत्यारोपण करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. अनेक रुग्णांना यासाठी मुंबईला पाठवले जायचे. आता ही सुविधा शहरात उपलब्ध होत असून या सुविधेला आरोग्य खात्याकडून गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात मान्यता मिळाली.
-डॉ. संजीव पठारे, वैद्यकीय संचालक, रूबी हॉस्पिटल