पुण्यात युवकावर भरदुपारी गोळीबार !

0
पुणे : पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भरदिवसा एका युवकावर गोळीबार झाला आहे. यात युवक जखमी झाला आहे. गजबजीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
मंगेश धुमाळ (वय 32, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.  मंगेश याच्यावर दोघांनी गोळीबार केला तसेच कोयत्याने वार केले. जखमी मंगेशने जवळच असलेल्या खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मंगेशला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. गुन्हे शाखेचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
मंगेशच्या पायाला गोळी लागली असून त्याच्या डोक्याला कोयत्याने वार केल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून मंगेशवर गोळीबार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु गोळीबार करणारे कोण होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. खडक पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.