आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या बदलीची शक्यता
पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये केलेले काम आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हयातील महत्वाची कामे मार्गी लावल्यामुळे आता पुण्याच्या आयुक्तपदी सौरभ राव तर दिल्लीत स्मार्ट सिटी सेलमध्ये कुणाल कुमार यांची नेमणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामाची दखल
पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. काही दिवसातच राज्यातील सनदी अधिकार्यांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये या दोन अधिकार्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव हे पुण्यात आयुक्त म्हणूण तर केंद्राच्या स्मार्ट सिटी सेलमध्ये कुणाल कुमार यांची बदली होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पुणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटीकडे लक्ष केंद्रीत करत पुण्याला देशात दुसरा क्रमांक मिळवून दिला. पुण्यातील काही भाजपच्या नेत्यांनी कुमार यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे आता यावेळी त्यांची बदली थेट केंद्रात होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे पुरंदर येथील विमातळाची महत्वाची जबाबदारी आहे. माळीणचे पुनर्वसन त्यांनी अतिशय योग्य पध्दतीने केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची बदली पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी होणार असल्याची चर्चा आहे. याअगोदर विकास देशमुख यांची जिल्हाधिकारी पदावरुन पुण्याच्या आयुक्तपदी बदली झाली होती.