पुणे । कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर समाजातील कटुता टाळावी, मराठा आणि दलित प्रतिनिधींची सलोखा परिषद व्हावी याकरिता पुण्यातील काही मान्यवर नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ही परिषद येत्या 15 दिवसांत व्हावी असाही प्रयत्न चालू आहे.याकरिता सोमवारी एक प्राथमिक बैठक घेण्यात आली. आंबेडकरी चळवळीतील नेते आणि मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, आमदार जयदेव गायकवाड, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, राहुल डंबाळे, शैलेन्द्र चव्हाण, प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर आदी सहभागी झाले होते. संविधान सन्मान समिती अशी एक समिती स्थापून परिषद घ्यावी, असे प्राथमिकरीत्या ठरले. या परिषदेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पुरुषोत्तम खेडेकर आदी मान्यवर नेते, चळवळीतील कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी नुकतेच एका मुलाखतीत अशी परिषद घ्यावी अशी सूचना केली होती. मराठा आणि दलित यातील कटुता टाळावी अशादृष्टीने प्रयत्न महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. कोरेगाव भीमा येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामंजस्य राहावे यासाठी पावले टाकली. पुण्यात होणारी सलोखा परिषद आणखी पुढचे पाऊल ठरेल.भीमा कोरेगाव दंगली नंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे दंगलीचे लोण पसरले. राज्यात गावोगावात मराठा आणि दलित यांच्या संबंधात तणाव निर्माण झाला. आगामी काळात त्यांची झळ बसू नये याची जाणीव समाजातील धुरिणांना झाली.