पुणे : आघाडीच्या जागावाटपात पुणे शहर लोकसभा मतदारसंघावरचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडल्याने काँग्रेसला लढतीसाठी मैदान मोकळे झाले. आगामी निवडणुकीत भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत होईल हेही स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहर लोकसभा मतदार संघावर दावा केला. ज्येष्ठ नेते शरद पवार निवडणूक लढवतील असे अंदाज व्यक्त झाला. पवारांनी उमेदवारीबाबत इन्कार केला पण पक्षाचा पुण्यावरील दावा कायम होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची अंतिम बोलणी आज शुक्रवारी झाली. त्यात पुण्यावरील दावा राष्ट्रवादीने सोडल्याचे समजताच काँग्रेस गोटात उत्साहाचे वातावरण पसरले. पक्षातील इच्छुकही सरसावले आहेत .
पुणे शहर काँग्रेस पक्षाने लोकसभा उमेदवारीसाठी पाच नांवांची शिफारस केली आहे . त्यात , प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी, पक्षप्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड आणि महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांचा समावेश आहे. काँग्रेसने निम्मी लढाई जिंकली आहे आता उमेदवारीकडे लक्ष राहील, अशी प्रतिकिया एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. लोकसभेला गत निवडणुकीतील विजेता भाजप विरूध्द काँग्रेस अशी पारंपारिक लढाई होईल.
हे देखील वाचा