पुणे । शासनाने 1997 पासून बंद केलेले रिक्षा परवाने आता सर्वार्ंसाठी खुले करण्यात आल्याने मागील वर्षभरात 20 हजार रिक्षांची भर पडली असून, सध्या शहरात 66 हजार रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. नव्याने दाखल झालेल्या रिक्षा या सीएनजी प्रकारातील असून, इंधनासाठी रिक्षाचालकांना मात्र रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागत आहे. 1997 पासून शासनाने रिक्षा परवाने देणे बंद केले होते. त्यामुळे दुसर्याच्या परवान्यावर रिक्षा चालवून शेकडो रिक्षाचालक स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, आता मागेल त्याला परवाना देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तब्बल 19 वर्षानंतर परवाने देणे सुरू झाल्याने नव्याने रिक्षांची संख्या शहरात वाढत आहे.
रिक्षांबरोबरच सार्वजनिक प्रवासीसेवेत नव्याने येणार्या सर्व बस सीएनजीवरीलच आहेत. त्याचप्रमाणे अनेक खासगी मोटारीही सीएनजीवर परावर्तित करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. एकीकडे रिक्षांची संख्या वाढत असली तरी त्याप्रमाणात शहरात सीएनजी पंपांची संख्या कमी असल्याने रिक्षाचालकांना तासन् तास इंधनासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे.
1997 झाली परवाने देणे बंद केल्यानंतर शहरात 46 हजार परवानाधारक रिक्षा पुण्याच्या रस्त्यावर धावत होत्या, आता त्यात 20 हजार रिक्षांची मागील वर्षात भर पडली असून, पुणे शहरातील परवानाधारक रिक्षांची संख्या 66 हजारांवर गेली आहे. असे असले तरी मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रिक्षांची संख्या निम्मी असल्याचे समजते. मुंबईत ती संख्या 1 लाख 39 हजार इतकी आहे. सद्यस्थितीत शहरातील सर्वच रिक्षा सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या आहेत.
भारतात सर्वाधिक नवीन वाहने पुण्यात
सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस पुणे शहरात खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीमध्ये 81 लाख 78 हजार 824 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक वाहन नोंदणी महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रात 20 लाख चार हजार 484 वाहनांची नोंदणी झाली. त्यामुळे पुणे प्रादेशिक कार्यालयात सर्वाधिक 2 लाख 21 हजार 980 वाहनाची नोंदणी झाली आहे.