पुण्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींची सुटका

0

पुणे : हिंजवडी भागात एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून सात तरुणींची सुटका केली. याप्रकरणी पाच दलालांना अटक करण्यात आली.
सुटका करण्यात आलेल्या तरुणी पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, नेपाळ तसेच महाराष्ट्रातील आहेत.

कुमार बलबहाद्दुर प्रधान, रणजित बलबहाद्दुर प्रधान, शामसुंदर गंगाबहाद्दूर नेवार, बिजू भक्ती शर्मा सर्व आसामचे आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी साथीदार बलीराम फौनी गौर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधान, नेवार, शर्मा यांनी हिंजवडी आयटी पार्कपासून वीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका इमारतीत सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. परप्रांतातील तरुणींना आमिष दाखवून तेथे वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले जात होते.

गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नरेश बलसाने यांना ही माहिती मिळाली होती. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी शहानिशा करून तेथे सापळा लावला. पोलिसांनी सदनिकेवर छापा टाकून सात तरुणींची सुटका केली. अटक करण्यात आलेले दलाल व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या युवतींची छायाचित्रे ग्राहकांना पाठवायचे. एखाद्या ग्राहकाने दलालांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तर त्याला ओळखपत्राची मागणी केली जायची. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ओळखपत्राचे छायाचित्र दलालांना पाठवावे लागायचे. खातरजमा झाल्यानंतर दलाल व्यवहार ठरवायचे, असे पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी सांगितले.

ज्या सदनिकेत वेश्या व्यवसाय सुरू होता. त्या सदनिकाच्या मूळ मालकाची माहिती घेण्यात येणार आहे. सदनिका भाडेतत्त्वावर देताना मालकाने खातरजमा करणे गरजेचे आहे. सदानिकेच्या मालकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले.