पुण्यात व्यापार-उद्योग केंद्र

0

पुणे । शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या 20 एकर जागेवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर व्यापार-उद्योग संकुल उभे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला आहे. मेट्रो स्टेशन आणि व्यापार-उद्योग संकुल म्हणून ही जागा वापरल्यास दरमहा नियमित लाखो रुपयांचा महसूल राज्य शासनाला मिळू शकतो, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. राज्यावरील कर्जाच्या बोजामुळे विकासकामांसाठी निधी नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाच्या मालकीच्या जमिनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकसित केल्यास मोठी मदत होऊ शकते. पुणे शहराच्या मध्यभागी आणि आजूबाजूला अशा बर्‍याच जमिनी आहेत. त्या विकसित करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएच्या धर्तीवर पीएमआरडीएने पुण्यातील मोक्याची आणि चांगला व्यावसायिक वापर होऊ शकेल अशा काही जागांची पाहणी केली आहे.

औंधची जागा विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची
यामध्ये शिवाजीनगरमधील 20 एकरावर उभी असलेली शासकीय तंत्रशिक्षण विभागाची जागा योग्य आहे. या संदर्भात प्राथमिक पातळीवर पीएमआरडीएने विभागीय कार्यालयाबरोबर चर्चा केली असून, तसा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले. पीएमआरडीएने शासकीय तंत्रशिक्षण विभागाच्या 20 एकरांवरील सर्व विभाग हलविण्याचा दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. या निर्णयामुळे येथे प्रथम, द्वितीय व अंशकालीन पदविका अभ्यासक्रमांतील विद्याशाखामध्ये शिक्षण घेणारे असे 3 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. या संस्थेची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 अशा सत्रांत सुरू असते. तसेच विद्यार्थी शहराच्या व जिल्ह्यातून येथे रोज ये-जा करत असतात. त्यांना शिवाजीनगर एसटी स्टॅँड आणि पुणे स्टेशनवरून हे अंतर जवळचे आहे. मात्र पीएमआरडीएने दिलेली औंध आयटीआयची जागा या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अपुरी आणि गैरसोयीची आहे. त्यामुळे आम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही, असा अभिप्राय राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालय कार्यालयाला पाठविला आहे, असे तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार यांनी सांगितले.

मैदानाकरिता मोकळी जागा नाही
डॉ. दिलीप नंदनवार यांनी सांगितले की, पीएमआरडीएने प्रस्तावित स्थलांतरणाचे दिलेले ठिकाण म्हणजे औंध आयटीआयमध्ये उपलब्ध 12.65 हेक्टर जागेवर एकूण 35369 चौ.मी. बांधकाम आहे. तसेच तेथे आणखी काही नवीन इमारतींचे बांधकाम प्रस्तावित असल्याचे दिसते. त्या संस्थेच्या जागेतून हायटेन्शन पॉवरलाइन जात असून, सध्याच्या परिस्थितीत त्या ठिकाणी खेळाच्या मैदानाकरिता मोकळी जागा नसल्याचे दिसून येते. औंध आयटीआय ही राज्याच्या कौशल्य विकास विभागांतर्गत येते, तर शासकीय तंत्रशिक्षण संस्था ही राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांर्तगत येत आहे. हेही कळविले आहे.

20 एकर जागेसाठी दोन प्रस्ताव
किरण गित्ते म्हणाले की, व्यापार-उद्योग संकुलासाठी आम्ही दोन प्रस्ताव पाठवले आहेत. पहिला शिवाजीनगरचा शासकीय तंत्रशिक्षण विभाग पूर्णत: औंध आयटीआयमध्ये स्थलांतरित करायचा आणि दुसरा 20 एकर जागेतील दहा एकर जागेवर व्यापार-उद्योग संकुल आणि दहा एकर जागेवर शासकीय तंत्रशिक्षण विभाग राहावा, असा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. शासकीय तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार यांच्याबरोबरही आम्ही सकारात्मक चर्चा करत आहोत.