नवी दिल्ली : देशातील करोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकड्यानुसार, देशातील करोनाबाधितांची संख्या ५१९४ तर महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १०७८ वर पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या असलेले राज्य ठरले आहे. देशात १४९ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर आत्तापर्यंत ४०२ जणांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. बुधवारी राज्यात आज पुन्हा ६० नवे करोना रुग्ण सापडले आहेत. यातील सर्वाधिक ४४ रुग्ण हे एकट्या मुंबईतीलच आहेत. आरोग्य विभागाने गेल्या २४ तासांत आढळलेल्या करोना रुग्णांची यादी जारी केली. गेल्या २४ तासांत मुंबईत ४४, पुण्यात ९, नागपूरमध्ये ४ आणि नगर, अकोला, बुलडाण्यात प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. धारावीतही आज दोन करोना पॉझिटिव्ह सापडले असून धारावीतील करोना रुग्णांची संख्या ९वर गेली आहे. त्याशिवाय माहीममध्येही पहिल्यांदाच दोन नवे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. माहीममध्ये सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण मटन विक्रेता असून एका नर्सलाही करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरी बसण्याऐवजी विनाकारण बाहेर फिरत असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे.