पुणे-विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पुण्यातील गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, त्यापाठोपाठ आता अहमदनगरमध्येही गणपती मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार घातला आहे.
डीजेला बंदी केल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीवर माळीवाड्यातील बारा मानाच्या गणपती मंडळांचा बहिष्कार टाकला आहे. पोलीस प्रशासनाचा निषेध करत थेट गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यामुळे आज केवळ मानाचा पहिला गणपती म्हणजे विशाल गणपतीची मिरवणूक निघेल. मात्र त्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या 12 गणेश मंडळांनी मात्र मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशानुसार 75 डेसीबलपेक्षा जास्त आवाज न करण्याचा शब्द या मंडळांनी पोलिसांना दिला. मात्र पोलिसांनी डीजे मिरवणुकीत आणला तर कारवाई करु, असा इशारा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे ऐनवेळी डीजे न वाजवता पारंपरिक वाद्य कुठून आणणार असा प्रश्न गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. परिणामी नाराज झालेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. पोलीस प्रशासनाचा निषेध करत थेट गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकण्यात आला.