पुण्यापाठोपाठ पिंपरी महापालिकेचीही थुंकीबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई

0

रस्त्यावर थुंकल्यास महापालिकेचा आर्थिक दंड

नऊ जणांकडून केला हजार रुपये दंड वसूल

पिंपरी : तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर रोज अनेकजण थुंकत असतात. शहर अस्वच्छ करण्यामध्ये या लोकांचा मोठा वाटा आहे. कुठेही उभे राहून अगदी चालत्या बसमधूनही हे थुंकीबहाद्दर रस्त्यावर आपला राग व्यक्त करीत असतात. त्यामुळे बाहेरील लोकांवर ही घाण पडते. त्यामुळे अनेकदा सांगुनही हे थुंकीबहाद्दर ऐकत नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून रस्त्यात थुंकणार्‍यांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईमुळे पुणेकरांमधील कुठेही थुंकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेपाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अस्वच्छता पसरविणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या 9 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार 350 रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

थोडे नियंत्रण येईल

केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन नियम आणि 2016 च्या तरतुदीचे पालन न करणार्‍या व्यक्ती अथवा संस्थांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान केले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून रस्त्यावर थुंकल्यास कारवाई केली जात आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. रस्त्यांवर थुंकल्याल 150 रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक दंड केल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर थोडे नियंत्रण येईल. त्यामुळे कचरा टाकणार्‍यांवर, रस्त्यांवर थुंकणार्‍यांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल, हे नक्की, असेही अतिरिक्त आयुक्त गावडे यांनी सांगितले.

गेल्या 15 दिवसातील कारवाई

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यावर कारवाईची मागणी लोकांतून होत होती. आता महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, कचरा टाकणारे, उघड्यावर लघुशंका करणार्‍यांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या 15 दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या 9 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार 350 रुपये दंड वसूल केला आहे. तर, रस्त्यावर कचरा टाकणार्‍या 24 जणांकडून चार हजार 320 रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त गावडे यांनी सांगितले