पुणे । प्रालीग कबड्डीमध्ये पुणेरी पलटन महत्त्वाचा संघ आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत पुणेरी पलटन संघाने दोन वेळा पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवले. पण दोन्ही वेळा लीगचे विजेतेपद मिळवण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले नाही. मागील सत्रात ते तिसर्या स्थानावर होते. यावेळी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात पुणेरी पलटनच्या व्यवस्थापनाने संघातील अनेक बड्या खेळाडूंना मोकळे केले, त्याचवेळी त्यांनी चढाईपटू दीपक हुडाला मात्र संघात कायम ठेवले. यावर्षी संघात अनेक बदल झालेले आहेत. युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असलेल्या या संघाच्या नेतेपदाची जबाबदारी दीपक हुडाकडे सोपवण्यात आली आहे. संघातील अनेक खेळाडूंनी तिशी ओलांडलेली आहे. त्यामुळे या लीगच्या काळात खेळाडूंचा फिटनेस कसा राहतो आणि संघाला विजेतेपदापर्यंत कसे नेता येईल अशा दुहेरी आव्हानांना दीपकला तोंड द्यावे लागणार आहे. संघाचे प्रशिक्षक बी. सी. रमेश यांनी यंदाच्या सत्रातील तयारीबद्दल बोलताना सांगितले की, प्रत्येक संघासाठी वेगवेगळी रणनीती तयार केली आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये यावेळी गुजरात फॉर्च्युन आणि यु मुंबाचे कडवे आव्हान असेल.
संघातील तीन अष्टपैलू खेळाडू, कर्णधार दीपक हुडा आणि यावर्षी संघात आलेला धर्मराज चेलारथनमुळे संघ संतुलित असल्याचा दावा प्रशिक्षक बी. सी. रमेश यांनी केला आहे. लीगच्या तिसर्या सत्रापासून दीपक हुडा या संघातून खेळतोय. दीपकमुळे पुणेरी पलटनच्या आक्रमणाला बळकटी मिळाली आहे. मागील सत्रात आठ सुपर टॅकल करणारा धर्मराज नवीन संघातून बचाव कसा राखतोय, याकडेही इतर संघांचे लक्ष असेल.
यंदाच्या लिलावात धर्मराजसाठी पुणेरी पलटनने 46 लाख रुपये मोजले आहेत. याशिवाय 66 लाख रुपयांमध्ये खरेदी केलेल्या संदीप नरवालवर लौकिकाप्रमाणे खेळण्याची जबाबदारी असेल. पुणेरी पलटनने परदेशी खेळाडूमंध्ये बांगलादेशाच्या झिया उर रेहमानला 16.6 लाख आणि जपानच्या ताकामित्सु कोनोला आठ लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. हे दोन्ही परदेशी खेळाडू प्रतिस्पर्धी संघाना आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, असा दावा रमेश यांनी केला आहे.
अंतिम फेरी अजून लांबच
प्रो लीगच्या पहिल्या आणि दुसर्या सत्रात पुणेरी पलटन संघ शेवटच्या स्थानावर होता. तिसर्या सत्रात मात्र या संघाने कात टाकलेली होती. या सत्रात संघाने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले, पाटणा पायरेट्स संघाकडून हरल्यानंतरही त्यांनी बंगाल वॉरियर्सला हरवत तिसरा क्रमांक मिळवला. चौथ्या सत्रातही संघाने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले, एकही सामना जिंकता न आल्यामुळे त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यावेळी चांगल्या खेळाडूंचा समावेश असल्यामुळे इतर संघाना चकित करून अंतिम फेरीत स्थान मिळवणार असे दीपकने सांगितले.
1 यंदाच्या हंगामात प्रत्येक संघाने वेगवेगळ्या पद्धतीने तयारी केली असली, तरी पुणेरी पलटनसमोर यु मुंबा आणि गुजरात संघाचे आव्हान असेल.
2 संघात तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश. अनुभवी खेळाडूंनी वयाची तिशी ओलांडलेली असल्याने 13 आठवडे रंगणार्या स्पर्धेत या खेळाडूंच्या फिटनेसची चिंता.
3 गतविजेता पाटणा पायरेट्स संघाचा कर्णधार धर्मराज चेरालथन यावेळी पुणेरी पलटन संघातून खेळणार. संघाचा बचाव चांगला राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार
पुणेरी पलटनचा संघ
चढाईपटू : दीपक हुडा, अक्शय जाधव, गुरुनाथ मोरे, राजेश मोंडल, रोहितकुमार चौधरी, सुरेशकुमार, उमेश म्हात्रे.
बचावपटू : धर्मराज चेरालाथन, गिरीश एरनाक, मोहम्मद झिया उर रेहमान. अष्टपैलू : अजय, नरेंद्र हुडा, रविकुमार, संदीप नरवाल, ताकामित्सु कोनो.