पुणे : शहराला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी दरदिवशी 1,350 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पाटबंधारे विभागाकडून धरणातील पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने शेतीसाठी जादा पाणी सोडले जात आहे. परिणामी शहरावर पाणी कपातीची वेळ ओढावली असून शहरासाठी दरदिवशी 1,350 एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पाण्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागात झालेला करार 1997 सालचा असून हा करार नव्याने करून शहराला आवश्यक असलेले पाणी देण्यात यावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी पत्रात केली आहे. पाटबंधारे आणि महापालिकेत झालेल्या करारानुसार, 11.50 टीएमसी पाणी शहरास मिळणे बंधनकारक आहे. तसेच त्यात मुळ कराराप्रमाणे गळती आणि वाणिज्य वापरासाठी 10 टक्के अधिक पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेस सध्या 1,265 एमएलडी पाणी देणे पाटबंधारे विभागास बंधनकारक आहे. गेल्या 20 वर्षांत वाढलेली लोकसंख्या, महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली 2000 मधील 23 गावे, नव्याने समाविष्ट झालेली 11 गावे आणि हद्दीजवळ द्याव्या लागणार्या पाण्याचा विचार करून तातडीने 1,350 एमएलडी पाणी मिळावे अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली आहे.