पुणे: देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. त्यातच एक लॉकडाऊन हा एक पर्याय आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये देखील पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याची घोषणा केली आहे. सोमवारपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे.
१३ जुलैपासून २३ जुलैपर्यंत १० दिवस लॉकडाऊन असणार आहे. १० दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अजित पवार यांनी सूचना केल्या आहेत. लवकरच याची नियमावली जाहीर होणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देशही अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.