मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. पुण्यातील रुग्ण संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. राज्य सरकारने पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने आढावा घेत असून प्रशासनाला सूचना करत आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री देखील पुण्यासाठी पुढे सरसावले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते घरूनच काम करत होते. त्यांच्यावर त्यामुळे टीका देखील झाली. आता ते मातोश्रीच्या बाहेर पडले असून पुण्याला जात आहे. आज सकाळी स्वत: गाडी चालवत ते पुण्यासाठी रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राज्यात फिरावे, परिस्थितीची माहिती घ्यावी असे विरोधकांकडून सातत्याने सांगण्यात आले. मुख्यमंत्री घरीच असतात, सरकार कोण चालवत आहे? असा प्रश्न देखील विरोधकांनी केला. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मला राज्यात फिरण्याची आवड असल्याने मी तळागाळात जाऊन कोरोनाची माहिती घेत आहे’ असे म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात फिरायला हवे, लोकांना दिलासा द्यायला हवे असे देखील म्हणाले होते. दरम्यान आता मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडले आहेत. शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ऐकला अशी देखील चर्चा सुरु आहे.