पुण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस सरसावले

0

खासदारकीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा; काँग्रेसकडून पारंपरिक मतदारांचा हवाला

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीही जास्त जागा मागण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळायला सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये खासदारकीची जागा आमचीच असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यातून काँग्रेसकडे खासदारकीसाठी चेहरा नसल्याने राष्ट्रवादीला जागा मिळण्याबाबत जास्त आत्मविश्‍वास आहे. विधानसभेतही आठ जागांपैकी बहुतांश जागांवर सत्ता काबीज करण्याचे स्वप्न राष्ट्रवादीने बाळगले असून, त्यादृष्टीनेच विधानसभा मतदार संघातही कार्यक्रमांचे नियोजन पक्षातर्फे करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येते हे येणारा काळच ठरवणार आहे. 2014मध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे राष्ट्रवादीला आपल्या विधानसभेतील सर्व जागा कायम राखता आल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत ही सर्व सत्तास्थाने गमावण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली. ती पुन्हा मिळवण्याची धडपड राष्ट्रवादीने सुरू केली आहे. त्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीला पोषक वातावरणही मिळत आहे.

राष्ट्रवादीच्या सर्व चळवळी पुण्यातूनच

पुण्यामध्ये एखादी चळवळ उभी राहिली की, ती अल्पावधीत देशव्यापी होते, याचे अचूक भान आणि ज्ञान राष्ट्रवादीकडे आहे. याचा परिणाम ‘बेटी बचाओ’पासून ‘संविधान बचाओ’पर्यंतच्या सर्व चळवळी राष्ट्रवादीने पुण्यातून यशस्वीपणे सुरू केल्या. भाजपच्या 100 नगरसेवकांनाही आपसातील दुफळीमुळे जे साध्य करता आले नाही, ते एकीचे बळ वापरून राष्ट्रवादीने सत्ता नसतानाही साध्य केले. म्हणूनच येत्या निवडणुकीत पुण्याच्या जागेवर आपला हक्क सांगण्याचे धाडस ते करू शकले.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे असोत किंवा अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्ता गेल्या दोन वर्षांमध्ये हलवून जागा केला आहे. पुण्यात घडणार्‍या छोट्या-छोट्या घटनेवरदेखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुटून पडत आहेत. अधिकार्‍यांना काळे फासणे असो किंवा पोलीस चौकी फोडणे असो, प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीच्या वरपासून शेवटच्या फळीपर्यंत काम करणारे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन आंदोलने, मोर्चे करत आहेत. पूर्वी आक्रमकता केवळ शिवसेनेची मक्तेदारी होती, पण आता त्याहीपेक्षा जास्त आक्रमकतेने राष्ट्रवादी काँग्रेस समोर येत आहे.

‘त्या’मुळे सोनल पटेल अडचणीत?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहारावरून काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता पुणे दौर्‍यावर आल्या असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस आणि महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी केल्याचे बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र लगेचच कलमाडींचे निलंबन रद्द करून त्यांना तिकीट देण्याचा अधिकार मला नाही, त्यामुळे असे कोणतेही चुकीचे संदेश जाऊ नयेत; असेही त्यांनी याविषयी स्पष्ट केले होते.

ज्या नेत्याने अनेक वर्षे पुण्यासाठी कार्य केले आहे. त्या नेत्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपुलकी असणे साहजिकच आहे. मात्र त्याबाबत वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. येथील इच्छुकांची भूमिका पक्ष श्रेष्ठींपुढे मांडणे एवढीच प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. पुणे लोकसभा ही काँग्रेसचीच जागा आहे. काँग्रेसनेच ही जागा लढवावी, असे सर्वांचेच मत आहे. शहरात काँग्रेसला मानणारा पारंपरिक मतदार आहे. काँग्रेसचे शहराशी भावनिक नाते आहे. त्यामुळे काँग्रेकडेच पुण्याची जागा येईल; अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह अन्य प्रादेशिक पक्षांनाही त्यात सामावून घेतले जाईल, अशी शक्यता आहे. या महाआघाडीत शिवसेना येईल, अशी कोणतीही शक्यता नाही. आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शिवसेना येण्याची शक्यता नाही, असेही पटेल यांनी सांगितले.