पुतळ्यांचे राजकारण!

0

भारताच्या राजकारणात पुतळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या त्यात महापुरुषांच्या पुतळ्यांना तर जास्तच. त्यांच्या विचारांपेक्षा त्यांच्या मूर्ती आणि त्यांचे उत्सव यातच त्यांच्या अनुयायांना बंदिस्त करण्यात इथल्या दांभिक आणि साम्राज्यवादी व्यवस्थेचे हित आहे. त्रिपुरात भाजपचा झेंडा रोवला गेला आणि रशियन क्रांतीच्या प्रणेत्याचा म्हणजे लेनीनच्या पुतळ्याला पाडण्यात आले. त्यानंतर देशभरात पुतळा विटंबनेचे लोण पसरत चालले आहे. देशभरात सुरू असलेल्या पुतळा या विटंबनाचे लोण शुक्रवारी औरंगाबादपर्यंत पोहोचले आहे. शहरातील समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला रात्री डांबर लावण्याचा प्रकार करण्यात आला. गुरुवारी केरळमध्ये अज्ञात व्यक्तींनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. गांधींजीच्या पुतळ्यावरील चष्मा तोडला.

त्रिपुरात अडीच दशकांची डाव्या पक्षांची सत्ता उलथल्यानंतर उन्मादाच्या भरात तोल सुटलेल्या संशयित भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी लेनीन यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. त्यानंतर मंगळवारी तामीळनाडूत द्रविड आंदोलनाचे जनक रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याला लक्ष्य करण्यात केले गेले. बुधवारी कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली, तर उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. पुतळ्याच्या विटंबनेनंतर भीषण दंगल पसरते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. राज्यात 1995 ला महाराष्ट्रात शिवसेना भातपची सत्ता आली आणि मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. दिवंगत गोपीनाथ मुंडे तेव्हा गृहमंत्री होते. पोलिसांनी गोळीबार केला त्यात 11 निरपराधांचा बळी गेला. त्यानंतर दलित समाजात जबरदस्त संतापाची लाट उसळली. दलित मतांचे ध्रुवीकरण झाले. दलित समाजातील नेत्यांचे ऐक्य झाले. त्यानंतर ती एकजूट पुन्हा राज्यातील सत्तांतराच्या राजकारणात मोठे योगदान देऊन गेली. हा इतिहास आपण पाहिला आहे. मुळात महापुरुषांचे विचार आणि त्यांचे समाजाच्या जडणघडणीत दिलेले योगदान याच्या स्मृती जिवंत राहाव्यात म्हणून पुतळ्यांची उभारणी केली जाते. परंतु, जेव्हा पुतळ्यांच्या वाईट राजकारणाला हिंसक वळण लागते तेव्हा मनात एक संताप येतो. मला आठवते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संतापून एकदा म्हणाले होते, सगळे पुतळे काढून टाका नाहीतर ते उभे करणार्‍यांवरच त्यांच्या संरक्षणाची आणि स्वच्छतेची जबाबदारी द्या.

मुद्दा लेनीनच्या पुतळ्यावरून सुरू झाला. कोण होता लेनीन! रशियातील कामगार शेतकरी आणि असंख्य शोषित जनतेला जुलमी राजाच्या जोखडातून मुक्त करताना क्रांतीचा जनक होता. सल्तनत बंदूक की नाली से जनम लेती है। असे म्हणत त्याने कामगारवर्गाची मोट बांधून जुलमी सत्ता उलथवली. ती सत्ता उलथवताना त्याने मार्कस्च्या तत्त्वज्ञानाचा पर्याय दिला होता. कष्टकरी आणि शोषित, श्रमिक जनतेचे राज्य उभारून त्याने जगाच्या इतिहासाला कलाटणी दिली. वर्गवादी व्यवस्थेला धक्का देणारी क्रांती त्याने घडवली. त्याची लढाई मानवतेची आणि समतेची होती. जगात एक श्रमिक वर्ग आहे तो आपल्या वेतनासाठी राबत असतो आणि दुसरा मालक वर्ग आहे जो त्या घामावर वाटेल तसा मलिदा गोळा करत त्या श्रमिकाचे शोषण करत असतो हे साधे सरळ पण वास्तववादी तत्त्वज्ञान लक्षात घेऊन त्याने ही दरी मिटवण्याचा प्रयत्न काला. लेनीनचा धोका लक्षात घेऊन अमेरिकन साम्राज्यवादी शक्तींनी लेनीनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याच लेनीनचा पुतळा त्रिपुरामध्ये माकप सरकार गेल्यावर भाजपच्या उन्मत्त कार्यकर्त्यांनी जमीनदोस्त केला. त्यावर भाष्य करत असताना भाजप आणि संघ परिवाराकडून कोण हा लेनीन? त्याचा भारताशी काय संबंध? असे उलट प्रश्‍न उपस्थित केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही समतेचा विचार मांडला. त्यांनाही समतेवरच विश्‍वास होता. फक्त त्या विचारांच्या सत्तेकडे घेऊन जाणारा रक्तरंजित क्रांतीचा मार्ग त्यांना मान्य नव्हता.

स्वातंत्र्यलढ्यात फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग याने फासावर जात असताना ज्याचे पुस्तक वाचले तोच हा लेनीन. भगतसिंग आणि त्यांचे साथीदारानी 1930ला लाहोर कोर्टात खटला चालू असताना गळ्या भोवती लाल रुमाल बांधून लेनीन दिवस साजरा केला होता. लेनीनने जगाच्या इतिहासात राजसत्ता म्हणून महिलांना अधिकार दिले. लोकमान्य टिळक अटकेत असताना मुबईच्या कामगारांनी केलेल्या संपाची स्तुती लेनीनने केली होती. आज सत्तेत असणार्‍या लोकांचे आदर्श जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा माफ करावे म्हणून माफी मागत होते तेव्हा त्या तुरुंगात लढणार्‍या भारतीय क्रांतिकारकांची प्रेरणा लेनीनच होता. लेनीनच भारतासारख्या वसाहतीक देशांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून अमेरिकेसारख्या साम्राज्यवाद्यांवर दबाव निर्माण केला. त्याने सोवियत रशियामध्ये शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. त्याचा वसानंतर भारताने घेतला. स्वातंत्र्यानंतर भारताला उभे राहण्यासाठी सावरण्यासाठी लेनीनच्याच रशियाने मदत केली. सोवियत रशियन क्रांतीनंतर मोठमोठ्या जमीनदारांकडून जमिनी हिसकावून गरिबांना वाटल्या होत्या. 14 देशांनी एकत्रित आक्रमण करून सोवियत रशियाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्या हल्ल्यातून देशाला अबाधित ठेवणार लेनीनच होता. अस्मितेवर आधारलेल्या राजकारणाला फार लांबचे आयुष्य नसते. ही उदाहरणे आपण पाहिली आहेत. भाषिक, प्रांतीय, व्यक्तीपूजक आणि विचारांची अस्मिता घेऊन राजकीय पक्ष फार काळ राजकारणात तग धरू शकत नाहीत. भारतात तसा जास्तीत जास्त वेळा डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला आहे. पुतळे हटवून त्यांची विटंबना करून विचार संपत नाहीत. विचारांची लढाई ही विचारांनीच झाली पाहिजे. पुढील काही काळ पुतळ्यांचा प्रश्‍न तापवून देशभरातील महत्त्वाच्या विषयांकडून जनतेचे आणि माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून सुरू आहे. मात्र, त्यात अनेकांचे बळी जाऊ नयेत.

विटंबनांचे लोण पसरणार
हा देश व्यक्तीपूजक व मूर्तीभंजक आहे. एका ब्रिटिश अधिकार्‍याचे मते भारतातील समाजव्यवस्था वर्णव्यवस्था व कर्मकांडांच्या दांभिकतेत इतकी दबलेली आहे की, भारतीयांना कोणताही परकीय शत्रू सहज आपल्या पालखीचे भोई म्हणून गुलाम बनवू शकतो. आपल्याबद्दल असे कोणी वक्तव्य केले तर सहजच आपल्या मुठी वळतात. परंतु, घडीभर अंतर्मुख होऊन विचार करायची ही वेळ आहे. त्रिपुरात भाजपचा झेंडा रोवला गेला व रशियन क्रांतीच्या प्रणेत्याचा म्हणजे लेनीनच्या पुतळ्याला पाडण्यात आले. त्यानंतर देशभरात पुतळा विटंबनेचे लोण पसरत चालले आहे. लेनीन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामास्वामी पेरीयार, सावरकर, शामाप्रसाद मुखर्जी अशा अनेक पुतळ्यांची विटंबना झाली. हे लोण आणखी पसरवले जात आहे. कारण ते पसरवून देशात वेगवेगळ्या विचारांच्या अनुयायांच्या दंगली पेटतात का? हे इथल्या विकृत मानसिकतेच्या व्यवस्थेकडून चेक केले जात आहे.

राजा अदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111