पुतीन, ओबामांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी!

0

राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपदावरील व्यक्तींच्या साहसाची चर्चा जेव्हा होते तेव्हा सर्वप्रथम नाव येते ते, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे! समुद्रतळाशी जाणे, पॅराशुटच्या मदतीने आकाशातून उडी मारणे, हिंस्त्र प्राण्यांना हाताळणे असे अनेक धाडसी किस्से त्यांच्या नावाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या फिटनेसची चर्चादेखील जगभरात चर्चेचा विषय ठरते. गेल्या काही वर्षांपूर्वी हेच धाडस अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केले होते. ओबामा यांनी घनदाट जंगले, बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंट, महानद्या, अथांग समुद्र अशा धोकादायक स्थळी जगण्याचा मंत्र देणार्‍या बेअर ग्रिल्स याच्या जगप्रसिद्ध ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या डिस्कव्हरी चॅनेलवरील मालिकेत हजेरी लावली होती. या दोन जागतिक नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बेअर ग्रिल्स यांच्यासोबत ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये झळकणार आहेत. पुतिन यांच्याप्रमाणे मोदी देखील त्यांच्या योगा व फिटनेसमुळे चर्चेत राहतात. आता तर तब्बल १८० देशांतील नागरिक मोदी यांच्या कधीही न पाहिलेल्या पैलूशी एकरूप होतील. मोदींच्या या धाडसामुळे अनेकांच्या काळजात धडकी भरली नसती तर नवलच! मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी या मोहिमेचा संदर्भ जोडला गेल्याने मोदींना अनेक प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाचा चेहरा म्हणजे बेअर ग्रील्स हा जगभरामध्ये त्याच्या साहसासाठी प्रसिद्ध आहे. एखादा माणूस संकटात अडकला तर तो कसा वाचू शकेल याबद्दलचे प्रात्यक्षिके दाखवणारा बेअरचा चेहरा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मुळे घराघरात पोहचला आहे. जंगलामध्ये एकटेच अडकल्यावर आपण नैसर्गिक साधनांचा वापर करुन लोकवस्तीपर्यंत कशाप्रकारे पोहचू शकतो याबद्दल भाष्य करणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला असून १८० हून अधिक देशांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित होतो. काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी ग्रिल्स यांच्यासोबत या मालिकेकरिता विशेष भागाचे चित्रीकरण केले होते. भारतामधील प्रसिद्ध नद्या आणि जंगलांमध्ये हे चित्रीकरण पार पडले. हा भाग १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. ग्रिल्स यांनी याविषयीची माहिती ट्विटरव्दारे दिली. बेअरसोबत हाती लाकडाचे शस्त्र हाती घेतलेले, रानवाटा तुडवणारे, नदीचा प्रवाह कापणार्‍या पंतप्रधानांचा व्हिडीओ सोमवारी प्रसिद्ध झाला आणि पंतप्रधानांचे हे नवे रूप पाहून सर्वच चकित झाले. फिटनेसबाबत जागृत असलेले मोदी सर्वांना परिचित आहेत. मात्र बेअरसोबतच्या व्हिडीओमध्ये ते रिव्हर राफ्टींग करतांना दिसत आहेत. त्यांच्या या धाडसाचे जागतिकस्तरावर कौतुक होत आहे मात्र त्याच वेळी काँग्रेसने मॅन व्हर्सेस वाईल्डचे पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन जोडल्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. मोदी विरोधकांना आयते कोलित मिळाल्यामुळे या कार्यक्रमावर टीकादेखील होणे अपेक्षित होते. कारण, पुलवामा दहशतवादी हल्ला सीआरपीएफच्या जवानांवरच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या मनावर झालेला आहे. यामुळे या विषयाशी निगडीत प्रत्येक बाबी महत्त्वाच्या ठरतात. हा हल्ला जेव्हा झाला होता तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता, त्यावेळी पंतप्रधान मोदींची जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यातील काही छायाचित्रे समोर आली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये काँग्रेसने म्हटले होते, सीआरपीएफ जवानांवर हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी जिम कॉर्बेटला गेले आणि एक जाहिरात शूटिंग करण्यात व्यस्त होते. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते, नरेंद्र मोदींनी तर वेळेवर प्रतिक्रिया पण दिली नाही. दिवसभर जिम कॉर्बेटमध्ये फिरत राहिले. जाहिरातीचे शूटिंग करत होते. देश आपल्या शहिदांचे मृतदेह गोळा करत होता आणि पंतप्रधान मोदी आपली घोषणाबाजी करून घेत होते. हे मी नाही, पत्रकारांनी फोटोसह लिहिले आहे. मात्र पीएमओने हे सर्व आरोप फेटाळून लावत सभेनिमित्ताने मोदी उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी केवळ जिम कॉर्बेटसह परिसराला भेटी देवून माहिती घेतल्याचा दावा केला होता. आता खुद्द बेअर ग्रिल्सने या मोहिमेबद्दलची माहिती दिल्याने कोण खोटे बोलत होते व कोण खरे? याचा उलगडा होत आहे. जनतेच्या दरबारात याचा खुलासा मोदींना करावाच लागेल. मात्र या गदारोळात मोदींचा हा धाडसी उपक्रम दुर्लक्षून चालणार नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या देशाचा पंतप्रधान अशा साहसी मोहिमांमध्ये सहभागी होतो, यातून मोदींचा कणखरपणा जगासमोर येईल. याचे राष्ट्रीयपेक्षा आंतराष्ट्रीय पातळीवर अनेक फायदे आहेत. आक्रमक व कणखर नेतृत्त्वाच्या नादी सहसा कोणी लागत नाही व जर कोणी लागला तर तो कोणाच्या नादी लागायच्या लायकीचा राहत नाही, असा आजवरचा इतिहास सांगतो. यामुळे ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ कार्यक्रमामुळे मोदींची प्रतिमा आणखीनच कणखर होईल, यात तिळमात्र शंका नाही. मोदींच्या या जंगलसफारीची चर्चा करतांना जंगलातीलच एक अत्यंत महत्त्वाची बाब दुर्लक्षित झाली. ती म्हणजे. देशात नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेची! वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय आपण अमेरिकेच्या तुलनेत आधी पूर्ण केले आहे. एकट्या भारतात ३ हजार वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. व्याघ्रगणना अहवालातील माहितीनुसार, देशात वाघांची संख्या २९६७ इतकी आहे. २०१० मध्ये भारतात १७०६ वाघ होते. २०१४ मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती २२२६ इतकी झाली. तर २०१८मध्ये वाघांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊन २९६७ ती इतकी झाली आहे. म्हणजेच मागील गणनेच्या तुलनेत यंदा वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे मृत्यूच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. महाराष्ट्रात २३०-२४० इतके वाघ आहेत, असेही हा अहवाल सांगतो. ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे. जंगल स्टोरीज् आवडत नाही, असा व्यक्ती क्वचितच सापडेल. व्याघ्रगणनेची स्टोरी प्रत्येकाला आवडली असेलच, यात शंका नाही मात्र मोदींची जंगल सफारीची स्टोरी आवडते का नाही? याचे उत्तर येणारा काळच देईल.