पुनर्प्रकिया केलेले रॉकेट अंतराळात सोडले

0

केप कॅनवेरल (अमेरिका) । अमेरिकेतील व्यावसायिक अ‍ॅलन मस्क यांच्या मालकीच्या स्पेस एक्सने अंतराळ संशोधनात एक इतिहास रचला. स्पेस एक्सने शुक्रवारी 3.55 मिनिटांनी पहिल्यांदाच पुनर्प्रक्रिया केलेले फाल्कन-9 रॉकेट अंतराळात पाठवून अंतराळ तंत्रज्ञानात क्रांती घडवली आहे. अंतराळ स्थानकात राहणार्‍या अंतराळवीरांसाठी खाद्यपदार्थ आणि आवश्यक साधनसामग्री घेऊन जाणार्‍या बुस्टर रॉकेट्सचा वापर फाल्कन -9 मध्ये करण्यात आला आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून सोडण्यात आलेल्या फाल्कन-9 द्वारे डीटीएच आणि इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर एसईएसचे 10 उपग्रह अंतराळात कार्यान्वित करण्यात आले. पुनर्प्रक्रिया केलेले रॉकेट पुन्हा अंतराळात पाठवण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. विशेष म्हणजे अंतराळात दहा उपग्रह यशस्वीरीत्या सोडल्यावर फाल्कन-9 पुन्हा जमिनीवर आले. अटलांटिक महासागरात स्पेस एक्सच्या तरंगत्या फ्लोटवर त्याला यशस्वीपणे उतरवण्यात आले. फाल्कन -9 ला यशस्वीरीत्या जमिनीवर उतरवल्यामुळे स्पेस एक्स त्यावर पुन्हा संशोधन करून ते तिसर्‍यांदा अंतराळात पाठवण्याचा प्रयत्न स्पेस एक्स करेल असे बोलले जात आहे. स्पेस एक्सला या मिशनमध्ये 7 एप्रिल 2016 मध्ये पहिले यश मिळाले होते. त्यावेळी फाल्कन-9 रॉकेटला ड्रोनशिपवर उतरवण्यात स्पेस एक्स यशस्वी झाली होती. त्यानंतर नासामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना अ‍ॅलेन मस्क यांनी फाल्कन-9 रॉकेटला पुन्हा अंतराळात पाठवण्याची घोषणा केली होती.

अंतराळ मोहिमा स्वस्त होणार
पुनर्प्रक्रिया केलेल्या रॉकेट्च्या वापरामुळे अंतराळ मोहिमांचा खर्च कमी होईल, असा दावा स्पेस एक्स कंपनीने केला आहे. रशिया, जपान आणि युरोपियन अंतराळ संघटना या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत. पण ते सर्व प्रायोगिक स्तरावर आहे. अंतराळात एखादा उपग्रह पाठवण्याकरिता रॉकेटचा वापर केला जातो. त्यामुळे कुठल्याही अंतराळ मोहिमेतील सर्वात जास्त खर्च रॉकेट्वर होतो. त्यामुळे अंतराळात सोडल्या जाणार्‍या रॉकेटचा पुनर्वापर करण्यासंदर्भात स्पेस एक्सने खूप आधीपासून संशोधनास सुरुवात केली होती. 2011 पासून यावर स्पेस एक्सने संशोधन करण्यास सुरू केले होते.