साक्री । यावर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून इयत्ता 7 वी व 9 वीच्या सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नववीला शिकवणार्या शिक्षकांचे पुनर्रचित अभ्यासक्रमावरील प्रशिक्षण 13 ते 25 सप्टेंबर या कालावधीत पुर्ण करण्यात आले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था धुळे व माध्यमिक शिक्षण विभाग जि.प. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील नववीला शिकविणार्या प्रत्येक शिक्षकाला विषयानुसार प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम तालुकास्तरावर साक्री येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे पार पडला.
नवीन अध्यापन व मुल्यमापन पद्धतीची दिली माहिती
या प्रशिक्षण कार्यक्रमात बदललेल्या अभ्यासक्रमातील नविन अध्यापनपद्धती, बदललेली मुल्यमापन पद्धत यासह प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य, हेतु, विद्यार्थी कृती, आदींबाबत माहिती देण्यात आली. पाठ्यांशाची तपशिलवार माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याने प्रत्येक विषयाच्या पाठांमध्ये त्यासंबंधीचा क्यू आर कोड उपलब्ध आहे. क्यू आर कोड वापरून व्हिडीओ किंवा माहिती कशी उपलब्ध करावी. यासंबंधी तज्ञ व्यक्तींकडून माहिती देण्यात आली. साक्री येथे तालुक्यातील माध्यमिक व आश्रमशाळांचे दररोज 100 पेक्षा अधिक शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. धुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटिल यांच्या मार्गदर्शनाने व साक्रीचे गटशिक्षणाधिकारी बी.बी. भील व शि.वि.अ.राजेंद्र पगारे, व्ही.बी. पवार यांच्या सहकार्याने प्रशिक्षण समन्वयक वनमाला पवार, ’डायट’ धुळेचे विषय साधन व्यक्ती शालिग्राम बच्छाव, गणेश सोनवणे, प्रतिभा पाटील तसेच विषय सहाय्यक सुनिल जाधव यांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.