पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” अंतर्गत मागील नुकसानीचा शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा; खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री .कैलाश चौधरी यांना मागणी.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…..

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” अंतर्गत मागील नुकसानीचा शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळणेसाठी महाराष्ट्र शासन अधिकारी तथा संबंधीस विमा कंपनीस तत्काळ आदेश करण्यात यावे, याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री .कैलाश चौधरी यांची संसदेच्या विशेष अधिवेशन दरम्यान नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.

यावर पुढील आठवड्यात महाराष्ट्र राज्यातील संबंधित अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधीसह नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात येऊन, योग्यती चौकशी करून लवकरच केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागील नुकसानीचा मोबदला अदा करण्यात येणार याबाबत केंद्रीय कृषी राज्यमंत्री .कैलाश चौधरी यांनी खासदार रक्षा खडसे यांना आश्वासन दिले.

जळगांव जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” योजना राबवतांना विमा कंपनी प्रतिनिधीमार्फत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार असतांना काही स्थानिक लोकप्रतिनिधी द्वारे याबाबत शासन स्तरावर चौकशीची मागणी करण्यात आली होती. यावर शासनातर्फे सदर बाबतीत चौकशी करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले व तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी मार्फत थांबविण्यात आली आहे.

सध्या संपूर्ण जळगांव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली असून, शेतकऱ्याच्या पिक वाया जाण्याची शक्यता आहे. आधीच केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळालेला नसून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आणि आता शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर दुसऱ्या पिकाची पेरणी केलेली असून, शासनामार्फत वरील तक्रारीपोटी कशाची चौकशी करण्यात येणार आहे असा प्रश्न आहे.

तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” चा मागील नुकसानीचा शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळणे बाबत, संबधितांना तत्काळ आदेश करण्यात यावे अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री .कैलाश चौधरी यांच्याकडे केली होती.