वर्ग एकमध्ये करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली विधानसभेत माहिती
हे देखील वाचा
नागपूर : प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावठाणमध्ये भोगवटदार वर्ग दोन म्हणून वाटप झालेले भूखंड वर्ग एक चे करण्यात आले आहेत. ज्या भागात वर्ग एक चे भूखंड अद्याप झालेले नाहीत तेथे शिबिराच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य सुरेश गोऱ्हे यांनी राज्यातील पुनर्वसित गावठाणातील भूखंडाच्या मालकीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना पुनर्वसित गावठाणामध्ये घर बांधण्यासाठी त्यांनी यापूर्वी धारण केलेल्या जमिनीच्या भोगवटा स्थितीसह भूखंड मंजूर करण्यात येतो. पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांना पुनर्वसित गावठाणामध्ये वाटप झालेल्या भोगवटदार वर्ग दोन भूखंडाचे रुपांतर वर्ग एकमध्ये करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार या वर्ग दोन जमिनी वर्ग एक झाल्या असून ज्या ठिकाणी अद्याप ही प्रक्रिया बाकी आहे, तेथे विशेष शिबिराच्या माध्यमातून ही कार्यवाही केली जाईल व तशी कागदपत्रे प्रकल्पग्रस्तांना दिली जातील, असेही राज्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, बाबुराव पाचर्णे यांनी भाग घेतला.