राजगुरुनगर : खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेल्या काही पुनर्वसित गावांमध्ये विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांचे स्वीय सहायक मनोहर गोरे यांनी दिली. दरम्यान, या गावांमध्ये अद्यापपर्यंत मुलभूत सेवासुविधांचा अभाव होता. मात्र, याबाबत पाठपुरावा करून आमदार सुरेश गोरे यांनी पुनर्वसित केलेल्या गावांना गावठाणाचा दर्जा मिळवून दिला. तसेच या गावांसाठी मुलभूत सेवा सुविधां मिळाव्यात म्हणून पाठपुरावा सुरु आहे.
त्यापैकी पाईट – गवारवाडी – पापळवाडी येथील पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा अंतर्गत रस्ता खडीकरण व गटार योजनेच्या कामांसाठी 50 लक्ष 61 हजार रुपये व पापळवाडी फाटा ते गवारवाडी, पापळवाडी गावठाणपर्यंत रस्ता करणे, या 3 किमी रस्त्याच्या कामासाठी 68 लक्ष 96 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 19 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामामध्ये त्यांना पाईटचे माजी सरपंच बळवंतराव डांगले व ग्रामपंचायत सदस्य जयसिंग दरेकर यांचे सहकार्य मिळाले. तसेच या कामांची वर्कऑर्डर झालेली असून, लवकरच या कामांना सुरुवात होईल, अशी माहिती देण्यात आली.