पुनर्वसित माळीणचा रविवारी लोकार्पण सोहळा

0

पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाचे पुनर्वसन राज्य सरकारने केले असून, या पुनर्वसित गावाचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. डिंभे धरणाच्या मागे डोंगराच्या पायथ्याशी माळीण गाव आहे. 30 जुलै 2014 च्या पहाटे गावामागील डोंगराचा कडा धुवांधार पावसामुळे खचला आणि गावावर कोसळला आणि गाव होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत माळीणमधील 151 ग्रामस्थ मृत्यमुखी पडले होते. या दुर्घटनेमुळे देशभऱात हाहाःकार उडाला होता. त्यानंतर तेथे मदतकार्यही सुरू होते.

माळीणच्या पुनर्वसनासाठी सरकारने कंबर कसली होती. मात्र, पुनर्वसनासाठी योग्य जागा मिळत नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेतून बचावलेले ग्रामस्थ सुमारे अडीच वर्षे पक्ष्याच्या शेडमध्येच राहत होते. शेवटी आमडे गावातील जागा पुनर्वसनासाठी निश्‍चित करण्यात आली. तसेच, जिल्हा प्रशासनाने पुनर्वसनाचे आदर्श असे मॉडेल उभे करेले.

पुनर्वसित गावाला पुन्हा धोका उदभवू नये, यासाठी जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इडिया, पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी) यांच्या साह्याने जागा निश्‍चित करण्यात आली. पाणी, वीज, शौचालये, अशा मुलभूत सुविधांसह टुमदार घरे प्रशासनाने उभी केली. तसेच, गावासाठी नवे टुमदार तलाठी कार्यालयही बांधण्यात आले. पुनर्वसित गावात 67 घरे बांधण्यात आली आहेत. यासाठी राज्य सरकारबरोबरच सीएसआरच्या माध्यमातूनही निधी उभा करण्यात आला.

अशा या पुनर्वसित गावाचा लोकाप्रण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी होत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबख मंत्री प्रकाश जावडेकर, महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळऱाव पाटील, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आधी उपस्थित राहणार आहेत.