पिंपरी-चिंचवड : पवनानदीकाठी असलेल्या पुनावळे घाटावर पुनावळेसह, ताथवडे, माळवाडी तसेच वाकड परिसरातील नागरिक गणेशोत्सवात गणेश विसर्जनासाठी येतात. सुमारे दीड-दोन हजार मूर्तींचे विसर्जन होते. पूर्वी ग्रामपंचायत काळातील या विसर्जन घाटाची बांधणी अथवा दुरुस्ती करण्याची तसदी महापालिकेने कधी घेतलेली नाही. त्यामुळे येथे घाटाचे अस्तित्व कोठे दिसत नाही. घाटाच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नागरिकांतून संताप व्यक्त
पवनानदीकाठी असलेल्या या घाटावर पुनावळेसह, ताथवडे, माळवाडी तसेच वाकड परिसरातील नागरिक गणेशोत्सवात गणेश विसर्जनासाठी येतात. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते दहा दिवसाच्या गणपतीपर्यंत सुमारे दीड-दोन हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होते. पूर्वी ग्रामपंचायत काळातील या विसर्जन घाटाची बांधणी अथवा दुरुस्ती करण्याची तसदी महापालिकेने घेतलीच नाही.
कोणत्याच सोयी नाहीत
गणेश मूर्ती विसर्जनाबरोबरच विविध धार्मिक विधींसाठी या घाटाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असला तरी याठिकाणची दूरवस्था, वाढलेले गवत, घाटाकडे जाणारा कच्चा रस्ता, परिसरातील अस्वच्छता पाहता याठिकाणी विसर्जन घाटाचे अस्तित्व आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पावसामुळे ऐन गणेशोत्सवात विसर्जन घाट पूर्णतः चिखलाखाली गेलेला असतो. याठिकाणी येण्यासाठी असलेल्या निसरड्या व कच्च्या स्वरुपाच्या रस्त्यामुळे भाविक घसरुन पडण्याचे प्रकार घडतात. याठिकाणी गणेश विसर्जन करणेही सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरत आहे. सिमाभिंत, सुरक्षा कठडे अशी कोणतीही सोय येथे नाही. महापालिकेचे विसर्जन घाटाच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
महापालिकेने यावेळी प्रथमच विसर्जनावेळी अग्निशमन दलाचे पथक तैनात ठेवले होते. विसर्जनावेळी नदीपात्रात धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असतो. घाटच गाळात जात असल्याने अशा परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून विसर्जन करावे लागते. मागील अनेक वर्षांपासून दुरूस्तीची मागणी होत आहे. गणेश भक्तांची होणारी गैरसोय तसेच दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने आता तरी जागे झाले पाहिजे.
– सागर ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते