इसिएतर्फे राबविला उपक्रम
निगडीः एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) तर्फे पिंपरी-चिंचवड शहरामधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था सोबत पर्यावरणाचे अनेक उपक्रम राबविते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन कामी गोडी निर्माण करण्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देऊन कामात सहभागी करून घेतले जाते. गुरुकुल शिक्षण संस्थेच्या अनुसाई ओव्हल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुनावळे शाळेत इसिएची विदयार्थी पर्यावरण समिती स्थापन करण्यात आल्याचे पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. प्रसंगी शाळेचे सचिव विश्वास ओहाळ, मुख्याध्यापक गणेश गवळी, इसिए स्वयंसेवक गोविंद चितोडकर, मीनाक्षी मेरुकर, शिकंदर घोडके, सुभाष चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, विकास भिंताडे, योगेश धावरे आदी शिक्षक उपस्थित होते.
पर्यावरणाच्या संस्कारांसाठी समिती
विकास पाटील पुढे म्हणाले की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पर्यावरणाच्या संस्कारांची आवश्यकता असते. तसे संस्कार विदयार्थी पर्यावरण समिती स्थापन करून विविध उपक्रमातून घडविण्याचे प्रयत्न इसिएच्या माध्यमातून केले जातात. प्रत्येक शाळेतून 30 विद्यार्थी निवडून त्यात 18 मुलींचा समावेश असतो. इसिएतर्फे उच्च प्रतीच्या मजबूत टोप्या, पर्यावरण अभ्यास पुस्तिका, पर्यावरण कार्टून फिल्म सीडी, 32 आठवडे अभ्यासक्रम पुस्तिका याचे मोफत वाटप करण्यात आले. संपूर्ण वर्षभर शाळेत विविध उपक्रम राबवून इसिए त्यांच्या अंतर्गत शालेय स्पर्धा आयोजित करून पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती निःशुल्क तत्वावर करीत असते. मार्गदर्शनपर भाषणातून चितोडकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संवर्धनाची आवश्यकता व प्रदूषण नियंत्रणात सर्वांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. कडुलिंब, बकुळ, अशोक अशा प्रकारची झाडे शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी महापालिका उद्यान विभागाची मदत व मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.