पुनावाला म्हणजे सूर्याजी पिसाळ

0

पुणे । शहजाद पुनावाला या व्यक्तीला त्याच्या घराच्या आसपासही कुणी ओळखत नाही. पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आजपर्यंत पक्षाच्या कामासाठी ते कधीही फिरकले नाहीत, दिल्लीत चमचेगिरी करून करून ते आपले स्वतःचे महत्त्व वाढविण्याचे काम करत होते. पुण्याची काँग्रेस शहजाद पुनावाला नाही तर जेधे, गाडगीळ, मोरे यांच्या योगदानामुळे उभी आहे. मोघलांना साथ देणार्‍या सूर्याजी पिसाळला ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्याची जागा दाखवून दिली, त्याचप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते पुनावाला याला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, या भाषेत पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यर आणि नगरसेवक अजित दरेकर यांनी टीका केली. महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव असलेल्या शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. ते इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड अध्यक्ष होणार आहेत. अध्यक्षपदाची मॅच आधीच फिक्स आहे, असा आरोप शहजाद यांनी केला. शिवाय पक्षात घराणेशाहीने मूळ धरल्याचेही त्यांनी म्हटले होते.

तहसीन यांनी शहजादसोबतचे नाते तोडले
पुनावाला यांच्या टीकेनंतर तहसीन यांनी भाऊ शहजादसोबतचे नाते तोडले असून तहसीन पुनावाला यांनी शहजाद यांच्यावर तोफ डागली आहे. राहुल यांच्यावर केलेली टीका अत्यंत खेदजनक प्रकार आहे, त्यामुळे आपण व्यथित झाल्याचे तहसीन यांनी म्हटले आहे. शिवाय आजपासून आपण शहजादशी भाऊ म्हणून असलेले नाते तोडत असल्याचेही त्यांनी ट्विटरवरून जाहीर केले. तहसीन पुनावाला काँग्रेसचे समर्थक असून ते रॉबर्ट वाड्रा यांचे मेहुणे आहेत.

राहुल गांधींवरच विश्‍वास
राहुल यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल यांचाच अर्ज पक्षाच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे आलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड निश्‍चित आहे, असा विश्‍वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.