हवेली । थेऊर येथील पुनावाला स्टड फार्म कंपनीमध्ये अष्टविनायक श्रमिक कामगार युनियनची स्थापना शिवसेनेचे विभाग प्रमुख स्वप्निल कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आली. कंपनी सुरू झाल्यापासून कामगारांची पिळवणूक होत आहे. तसेच कंपनीकडून पगार, दिवाळी बोनस व भविष्य निर्वाह निधी यांमध्ये कामगारांची फसवणूक करण्यात आली आहे. कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा यासाठी कुंजीर यांच्या माध्यमातून अष्टविनायक श्रमिक कामगार युनियन स्थापना करण्यात आली असल्याचे युनियनचे अध्यक्ष अविनाश कुंजीर यांनी दिली. सर्व कामगारांच्या उपस्थितीत युनियनची स्थापना करण्यात आली.
यावेळी कुंजीर यांनी कामगारांच्या अडचणी समजावून घेऊन कंपनीकडून कामगारांची फसवणूक होत असल्याने त्यासंदर्भात ठोस पुरावे गोळा करून कामगारांना न्याय मिळवून देऊ तसेच कंपनीच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्यात मदत करू तरीदेखील कंपनीने विचार न केल्यास कंपनी विरोधात खटला दाखल करू अशी ग्वाही त्यांनी दिली.