पुणे । दहीहंडी आणि गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपले असताना साऊंड, लाईट जनरेटर्स सेवा पुरविणार्या व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती. मात्र, शनिवारी दुपारी प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेतून चार बेस आणि चार स्पिकर लावण्याची मुभा दिल्याने इलेकट्रीकल जनरेटर असोसिएशन पुणे ने पुकारलेला हा संप मागे घेतला आहे.
डीजे लावण्यासंदर्भात प्रशासनाचे नियम स्पष्ट नसल्याचे सांगत शहराच्या विविध भागात वेगवेगळे नियम लावले जात आहेत. त्यामुळे डीजे चालकांना याचा नाहक त्रास होत असून पोलीस आरोपींप्रमाणे डीजे चालकांना मारहाण करतात. डेसिबलची माहिती नसताना त्यांच्या मर्जीप्रमाणे कारवाई करतात. महागड्या वस्तूंवर काठ्या मारून सामानाचे नुकसान केले जाते. दोन साउंड लावण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्यामध्ये देखील एक बेस एक टॉप की दोन बेस दोन टॉप असा घोळ आहे. त्यामुळे मंडळ आणि पोलीस यांच्या वादामध्ये नुकसान मात्र साउंडवाल्यांचेच होते. त्यामुळे साउंड अँड इलेकट्रीकल जनरेटर असोसिएशनने शुक्रवार (11 ऑगस्ट) पासून बेमुदत संप पुकारला होता. या संपाला शहरासह मुंबईतील पाला या संघटनेने देखील पाठिंबा दर्शविला होता. परंतु प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेतून यावर शनिवारी तोडगा काढण्यात आला. त्यामुळे डीजे आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.