पुन्हा भाजपच अव्वल!

0

पुणे :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद निवडणुकांत पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसर्‍या टप्प्यातही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयाचा फायदा झाला आहे.

पुणे व लातूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांपैकी पाच ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले असून, त्यामुळे नगराध्यक्षांच्या बाबतीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीचे नगराध्यक्षपद पटकावले असून, काँग्रेसने लातूरची सत्ता गमावली आहे. 14 पैकी भाजप 5, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर इतर चार ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. एका ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष विजयी झाला.

विजयाने भाजपमध्ये उत्साह
राज्यातील 14 पैकी 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांसह दुसर्‍या स्थानावर आहे. तर एका नगरपालिकेत शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा विजय झाला आहे. याशिवाय उर्वरित चार नगरपालिकांचे नगराध्यक्षपद हे इतर स्थानिक आघाडीकडे गेले आहे. त्यामुळे पुन्हा कमळाचीच चलती असल्याचे दिसून आले आहे.

पुणे जिल्ह्यात कमळ फुलले!
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व आळंदी नगरपरिषदांवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवत कमळ फुलविले. तर लोणावळा नगरपरिषदेत कमळ फुलले असले तरी त्रिशंकू अवस्था आहे. निर्विवाद वर्चस्वासोबतच तीनही परिषदांवर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या बारामतीत राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली असली तरी लातूरमध्ये मात्र काँग्रेसला धक्का बसला आहे.