पिंपरी-चिंचवड : महापालिका यंदापासून पुन्हा ’गणेश फेस्टिवल’ सुरू करणार आहे. तीन ते पाच दिवसांचा हा फेस्टिवल असणार आहे. या फेस्टिवल अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. आर. एस. कुमार हे महापौर असताना 1996 साली महापालिकेने पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिवल सुरू केला होता. या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. चार दिवस हा फेस्टिवल चालत होता. हा महोत्सव पिंपरी, निगडी, भोसरी अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला.
सांस्कृतिक पर्वणी
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, उदित नारायण, सोनू निगम, अण्णू मलिक, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार शहरवासीयांना अनुभवयास मिळाला आहे. गणेश फेस्टिवलच्या आयोजनावरून चढाओढ सुरू झाली. त्यामुळे प्रकाश रेवाळे महापौर असताना 2003 साली गणेश फेस्टिवल बंद केला. त्यानंतर एक वर्ष पिंपरी-चिंचवड उत्सव सांस्कृतिक संस्था आणि महापालिकेच्या सहकार्याने एक वर्ष गणेश फेस्टिवल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 2004 पासून पिंपरी-चिंचवड सोशल क्लब यांच्या वतीने 2014 पर्यंत 11 वर्ष गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. आता पुन्हा महापालिका गणेश फेस्टिवल सुरू करणार आहे.