पुन्हा रखडणार? : पुरंदर विमानतळाला वायूदलाचा आक्षेप!

0

पुणे : पुरंदर येथील बहुचर्चित विमानतळाला भारतीय वायूदलाने (आयएएफ) आक्षेप नोंदविला असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली असून, वायूदलाने नाहरकत दिली नाही तर हे विमानतळही रखडणार आहे. खेड-चाकणमधून विमानतळ पुरंदरला हलविण्यासाठी खटाटोप करणार्‍या राज्यातील शिवसेना व भाजपच्या नेत्यांना वायूदलाच्या निर्णयाने चांगलीच चपराक बसण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, या विमानतळाच्या व्यवहार्यता अहवालाच्या पूर्णतेसाठी सप्टेंबरअखेर होण्याची शक्यता असून, राज्याच्यावतीने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.च्या अधिकार्‍यांनी सद्या वायूदलाकडून नाहरकत मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

25 तारखेच्या बैठकीकडे लक्ष!
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.च्या (एमएडीसी) वरिष्ठस्तरीय अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्यावतीने पुरंदर विमानतळाच्या जागेबाबत सर्व प्रकारची कागदपत्रे व तांत्रिक माहिती वायूदलाच्या वरिष्ठांना देण्यात आली आहे. तथापि, जोपर्यंत वायूदलाकडून हिरवा कंदील मिळत नाही; तोपर्यंत राज्य सरकारला काहीच हालचाली करता येणार नाही. किंबहुना, वायूदलाने नाहरकत दिली नाही तर पुरंदर येथील विमानतळ बारगळू शकते, असेही सूत्र म्हणाले. वायूदलाकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यातही एमएडीसीच्या अधिकार्‍यांना अडचणी येत आहेत. मुळात यापैकी बहुतांश अधिकार्‍यांना वायूदलाशी संवाद व संपर्क साधून प्रश्न सोडवून घेण्याचा अनुभव नाही. त्यामुळे चर्चेची प्रक्रिया थांबलेली आहे. 25 ऑगस्टरोजी वायूदलाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक ठरलेली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, ते पहावे लागेल, असेही हे अधिकारी म्हणाले.

विमानतळाची व्यवहार्यता काय?
पुरंदर येथील विमानतळाबाबत सल्लागार कंपनीमार्फत व्यवहार्यता अहवालावर काम सुरु असून, अंतिम अहवाल सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. या अहवालात तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार असून, विमानतळाबाबत दीर्घकालिन नियोजनही प्रस्तावित केले जाणार आहे. विमानतळाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारी पातळीवर चांगलाच दबाव व घाई असली तरी, हे विमानतळ व्यवहारिक नाही, असे अनेक अधिकार्‍यांचे मत आहे. शिवाय, वायूदलाचा आक्षेप पाहाता, येथून पुन्हा चाकण-खेड भागातच विमानतळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.