संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची स्तुती होत असताना याच भाषणावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वराज यांच्यासह एकूणच मोदी सरकारला टोमणा मारलाय. काँग्रेसची दूरदृष्टी अखेर तुम्ही मान्य केलीत, त्याबद्दल आभार, असे खोचक ट्वीट राहुल यांनी करत आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या संस्थांची निर्मिती करून काँग्रेस सरकारने दाखवलेल्या दूरदृष्टीची आणि वारशाची दखल घेतल्याबद्दल आभार मानलंय.
अमेरिकेत राहुल गांधी यांनी भारतातील परिस्थितीवर भाष्य केल्यामुळे भाजपसमर्थक दुखावले गेले. त्यामुळे सोशल मीडियावर काँग्रेस उपाध्यक्षांविरोधात टीकेची राळ उठली. राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारी वक्तव्येही मंत्रिमंडळ सदस्यांनी आणि वरिष्ठ भाजप नेत्यांनी केली आहेत. त्यांच्या छोट्या छोट्या चुकांवर मोठमोठे विनोद करण्यात नेटिझन्स आणि नेते आघाडीवर असतात. राहुल गांधी अपरिपक्व आहेत, तर मग त्यांची देशपरदेशातील वक्तव्ये इतकी गंभीरतेने घेण्याचे कारण काय, हा प्रश्न उपस्थित होतो. भगवा परिवार राहुल यांना पाण्यात का पाहतो, गांधी घराण्याची इतकी भीती अजूनही त्यांना का वाटते, याचे मनन झाले पाहिजे. खरे तर मातृभूमीवर टीका केलीय की सरकारवर हे समजण्याइतपत शहाणपण भाजपच्या सत्ता व राष्ट्रवादी अभिनिवेशात झाकोळून गेले आहे. राहुल गांधी यांच्या भाषणाचा काळजीपूर्वक अभ्यास केला, तर दिसून येते की, त्यांनी भारतीय वास्तवाचा अनुभव घेतला आहे. देशापुढील समकालीन प्रश्नांची इतकी चांगली जाण आणि भविष्यवेधी विचार एक परिपक्वराजकीय नेताच देऊ शकतो. त्या कसोटीस राहुल गांधी उतरले आहेत. राहता राहिला प्रश्न निवडणुकांमधील यशाचा. आम्ही चुकलो. लोकांपासून तुटलो, हेही राहुल गांधी यांनी परदेशात मान्य केले. तेव्हा मात्र हे विरोधक खूश झाले होते.
घसरते राष्ट्रीय उत्पन्न, निश्चलनीकरण, रोजगारनिर्मितीत सरकारला आलेले अपयश, शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष, विद्वेष, हिंसा व असहिष्णुतेचे वातावरण हे तर जगातील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चिले जाणारे भारतातील मुद्दे आहेत. एकवेळ भारतीय प्रसार माध्यमांमध्ये दिसणार नाही, पण भारताच्या काही अप्रिय बातम्या रशिया, चीनच्या माध्यमांमध्ये ठळकपणे दिसतात. त्यामुळे राहुल गांधी यांनी नव्याने जगाला सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतातील विसंगती दाखवून दिल्या, या म्हणण्याला अर्थ नाही.
भाजपला जनतेचा कौल मिळाला हे खरे आहे. परंतु, त्यांचे भारतीय लोकशाही प्रणालीत राजकीय सामाजिकीकरण होण्यात अनंत अडचणी आहेत. मागील 65 वर्षांत काँग्रेसचे नेमके काय चुकले आणि काँग्रेसने देशाला काय दिले, याचे परीक्षण भाजप आणि भगव्या थिंक टँकला लोकांपुढे मांडता आलेले नाही. त्यामुळे त्यांचे जे काही काँग्रेस विश्लेषण आहे ते निवडणुकांमध्ये यश देण्यापुरते कवित्व म्हणून मर्यादित राहिलेले आहे. देशाचा राज्यकारभार चालवण्यास ते मुळीच मार्गदर्शक ठरलेले नाही. सन 1947मध्ये गरीब राष्ट्र असलेला भारत आज जगातील 10 सर्वश्रेष्ठ अर्थव्यवस्था असेल्या देशांच्या पंक्तीत स्थानापन्न आहे. 2014 ते 2017 इतक्या कमी कालावधीत झालेले हे स्थित्यंतर नाही. हे राहुल गांधी यांनी सांगितले. पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांचे योगदान विसरून कुणी इतिहासाचा विपर्यास करीत असेल, तर जगाच्या ध्यानात वास्तव आणून देणे क्रमप्राप्त ठरते. मोदी सरकार मागील सरकारांनी केलेल्या नियोजनातून साकारलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करणारेच ठरले आहे. त्या अर्थाने भाजप सरकार काँग्रेस सरकारांचेच विस्तारीकरण ठरलेले आहे. 65 वर्षांच्या प्रगतीचे श्रेय 2014मध्ये सत्तेत आलेले घेऊ लागले की, दावे हास्यास्पद ठरतात. राहुल गांधींचे अमेरिकेतील मतप्रदर्शन याविरोधातील प्रतिक्रिया आहे.
पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्यात झालेल्या दंगलींमुळे त्यांना काही देशांनी त्यांना व्हिसा नाकारला होता. जागतिक प्रसारमाध्यमांना गुजरातमधील हिंसाचाराबद्दल सांगण्यासाठी राहुल गांधी यांच्यासारखे कुणी गेले नव्हते. मोदींची जागतिक प्रतिमा त्या देशांमध्ये मलीन झाली. नंतर मात्र त्या देशांनी नाकारलेले मोदी भारताचा पंतप्रधान म्हणून जातात हा विलक्षण योगायोग आहे. स्वतःची लोकशाहीवादी व अहिंसक आंतरराष्ट्रीय प्रतिमा बनत असताना मोदींना राहुल गांधींनी झटका दिला तो महासत्तेच्या अंगणात अमेरिकेत. असे डावपेचही बालीश म्हणून संभावना केली जाणार्या राहुल गांधींना विदित आहेत. हे राष्ट्रवादाचा ज्वर चढलेल्यांना समजले तेव्हा तापमान उतरू लागले आहे. नमो विरुद्ध राहुल गांधी संघर्षात जागतिक व्यासपीठावरील निकाल भारतातील निकालासारखा भाजपच्या पारड्यात पडेल, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण काँग्रेस महात्मा गांधींची परंपरा सांगणारा पक्ष आहे. राहुल गांधी त्या पक्षाचे उपाध्यक्ष व भावी अध्यक्ष आहेत.
जागतिक स्तरावर देशांतर्गत घटनांचा कसा पडसाद उमटतो व किती ते किती वेदनादायी ठरते हे मोदींना चांगलेच ठाऊक आहे. गांधी घराण्याचा करिष्मा काय आहे हे पंतप्रधान मोदींना त्यांच्या परदेश दौर्यांमध्ये त्या-त्या देशातील राजकारण्यांशी झालेल्या भेटी दरम्यान समजले असेल. गेली अनेक वर्षे भारतावर काँग्रेसची राजवट होली. त्यामुळे भारत आणि गांधी हे समीकरण परदेशात रुळून गेलेले आहेत. त्यामुळे परदेशातील राजकरण्यांना गांधी घराण्याबद्दल औत्स्तुक्य असणे स्वाभाविक आहे.त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची किंवा व्यक्तिमत्त्वाची खिल्ली न उडवता देशाचा राज्यकारभार उत्तम करण्यासाठी, आपली विचारसरणी लोककल्याणाचा समर्थ पर्याय ठरू शकतो हे दाखवण्यासाठी मोदींना, पडद्यामागच्या संघाला व त्यांच्या शिलेदारांना सैद्धांतिक पातळीवर मेहनत घ्यावी लागणार आहे.