पुन्हा वसली झोपडपट्टी, पुन्हा होणार कारवाई

0

पनवेल: खांदा कॉलनी येथील वादग्रस्त बेकायदा झोपडपट्टी उद्ध्वस्त करून सव्वा महिन्याचा कालावधी उलटत नाही तोच पुन्हा एकदा राजकीय आश्रयामुळे झोपडपट्टी वसवली जात आहे. मतांचे राजकारण याला कारणीभूत असल्याने झोपडपट्टी उभारली जात असली तरी ती पुन्हा जमीनदोस्त करण्याचे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकिय संचालक भूषण गगरानी यांनी दिले आहे.

सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी लावून धरलेल्या मागणीनुसार खांदा कॉलनी येथील झोपडपट्टी 8 व 9 मार्चला प्रचंड पोलिस बंदोबस्तात नेस्तनाबूत करण्यात आली होती. अवैध धंद्यासाठी अभय असलेली झोपडपट्टी साडे सतरा एकर जमिनीमध्ये पसरली होती. सुमारे 400 कोटीहून अधिक रक्कमेच्या भूखंडांवर झोपडपट्टी दादांनी स्वतःची तुमडी भरली होते. याविषयी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांना फैलावर घेत ही कारवाई करून घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा काही झोपडपट्टी धारकांनी राजकीय नेत्यांच्या अभयामुळे अतिक्रमण केले आहे. सेंट जोसेफ हायस्कूलसमोरील सिडकोच्या त्याच भूखंडावर पुन्हा मोठ्या प्रमाणात झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कडू यांनी सकाळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांना बेकायदा झोपडपट्टीचे छायाचित्रे पाठवून पुन्हा अतिक्रमण हटविण्याची आणि शक्य असेल तर त्यांच्यावर सरकारी जागेवर कब्जा केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. हे अतिक्रमण काढून टाकण्याची तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन कडू यांना गगरानी यांनी दिल्याने, खांदा कॉलनीतील वाढत्या बेकायदा झोपडपट्टीवर पुन्हा एकदा लवकरच बुलडोझर चालणार आहे.