पुन्हा वाहू लागले आम आदमीचे वारे

0

पुणे । गेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी नवी ओळख घेऊन उतरली होती. मोदी लाटेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. हा पक्ष 2019 च्या निवडणुकीत पुन्हा उतरेल अशी चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेस, भाजप या पक्षांच्या राजकारणाला लोक वैतागले होते. सर्वच पक्षात भ्रष्टाचार असल्याने एक नवा पर्याय जनता शोधत होती. धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारा राजकीय पर्याय हवा होता. या वातावरणात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचा उदय झाला. दिल्ली विधानसभेत केजरीवाल विजयी झाले, देशभर एक वातावरण तयार झाले. भाजप,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी काँग्रेसविरोधात आघाडी उघडली होती. काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष, मनमोहनसिंग मौनी पंतप्रधान असा प्रचार भाजपने चालविला होता. पण, आम आदमी पार्टीच्या दिल्ली विजयाने मोदी आणि संघ परिवार गोंधळला. आता कोणाविरुध्द चालवायची असा तो पेच होता. मोदी यांच्या सभांना गर्दी कमी होऊ लागली. केजरीवाल यांना अनुकूल हवा तयार होत गेली. मात्र, याच दरम्यान काही कारणाने केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पद गेल्याने वलय गेले आणि नेमके हीच संधी साधून भाजपने केजरीवाल यांना नामोहरम केले. या पक्षाने तेव्हा पुण्यात सुभाष वारे यांना उमेदवारी दिली.

तिसर्‍या क्रमांकावर आम आदमी
आम आदमी पक्ष हा अन्य पक्ष विचारसरणी या पलीकडचा मानला गेला आणि या पक्षाने संपूर्ण समाजवादी पार्श्‍वभूमी असलेल्या वारे यांना पुढे केले. तिथेच पक्षाला पहिला दणका बसला. समाजवाद्यांना पुण्यात अजिबात स्थान नाही, जे उरले सुरले साथी होते ते वारे यांच्याबरोबर जाण्यास तयार झाले नाहीत. त्यामुळे वारे प्रचार यंत्रणा उभे करू शकले नाहीत. त्यात भाजप आणि काँग्रेसने प्रचंड खर्च चालविला होता. त्या तुलनेत आर्थिक आघाडीवरही वारे कमकुवत ठरले. तिसर्‍या क्रमांकाची मते त्यांना मिळाली. या निवडणुकीनंतर आम आदमीने एकही निवडणूक पुण्यात लढविली नाही.तरी काही प्रश्‍न घेऊन संघर्ष केला.

पक्ष विस्तारतोय
तरूण, सुशिक्षित यात असल्याने या पक्षाने नाव राखले आहे. दिल्लीमध्ये अनेक लोकोपयोगी कामे केजरीवाल सरकारने अलीकडे केली आहेत. हि सध्या जमेची बाजू आहे. पंजाब, गोवा राज्यात निवडणुका लढविल्या. गुजरातमध्येही संघटन केले आहे. दोनच दिवसांपूर्वी केजरीवाल आणि कमल हसन यांची चर्चा झाली. त्यातून हा पक्ष दक्षिणेकडेही विस्तारणार याची चिन्हे दिसू लागली. दिल्लीपुरता हा पक्ष राहील, अशी टीका केली जात होती. परंतु आम आदमी पार्टी हात पाय पसरत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करताना याची दखल घ्यावी लागेल.

– पडघम लोकसभेचे
राजेंद्र पंढरपुरे