मुंबई (निलेश झालटे) :- शिवसेना सत्तेत जरी असली तरी सरकारवर कुरघोडी करण्याचा एकही ‘मौका’ सोडत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाचे वेतन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला मदतीसाठी देण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शिवसेनेने आपल्या सर्व लोकप्रतिनिधींचे एका दिवसाचे वेतन शेतकरी कर्जमुक्तीच्या निधीसाठी देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी माहिती दिली. शिवसेनेकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांसाठी ही मदत दिली जात असल्याचे रावते यांनी सांगितले आहे. याआधीही अशाच प्रकारे सेनेकडून बऱ्याचदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला आहे.
मुख्य सचिवांना पाठविले पत्र
सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निधीला जमा करणार असल्याचे शासनआदेश काढले होते. या पार्श्वभूमीवर सेनेच्या सर्व प्रतिनिधींचे एका महिन्याचे मासिक मानधन शेतकऱ्यांच्या निधीसाठी देणार आहेत. यामध्ये शिवसेना पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हापरिषद अध्यक्ष, सदस्य , पंचायत समिती , ग्रामपंचायत तसेच महानगरपालिका, नगरपालिकेचे सदस्य या सर्व लोकप्रतिनिधींचे एका महिन्याचे मानधन शेतकरी कर्जमुक्तीच्या निधीसाठी देणार आहेत. यासंबंधी पत्र मुख्य सचिवांना पाठविले आहे. या पत्रात शिवसेनेचा हा निधी कोणत्या लेखशीर्षकाखाली जमा करावे? अशी विचारणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचा जुना फंडा वापरला
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपच्या सर्व मंत्र्यांना आवाहन केले होते मात्र केवळ 13 मंत्र्यांनीच मदतीचा निधी जमा केला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेने देखील तोच मदतीचा फंडा वापरला आहे. या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. याआधीही शिवसेनेने सरकारच्या जलशिवार योजनेवर कुरघोडी करत शिवजलक्रांती योजना राज्यात अनेक ठिकाणी राबविली आहे. तोच कित्ता गिरवत आता शेतकऱ्यांच्या मदतीच्या नावाखाली सेनेने सरकारवर पर्यायाने भाजपवर पुन्हा कुरघोडी केली आहे.
शिवसेनेने वंचितांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला वेळोवेळी मदत केली. उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीमधून आलेले 10 लाख रुपयांचे मानधन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी निधीला देणार आहेत.
-दिवाकर रावते, परिवहन मंत्री.