नाशिक: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी मोदींनी भाजपा जर पुन्हा सत्तेत आली तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेचा फायदा दिला जाईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमीनीची अट रद्द केली जाईल, अशी घोषणा केली.
२३ मेला निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी जर मोदी सरकार सत्तेत आले तर त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना किसान सम्मान योजनेची मदत दिली जाईल. त्यासाठी किमान पाच एकर जमिनीचा नियम हटवला जाईल. कांदा उत्पादकांसाठी स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्था निर्माण केली जाईल. शेतमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, या समस्येचे खरे कारण ग्राहक नाही तर दलाल आहेत. आमच्या सरकारने या दलालांविरोधातच लढाई छेडली आहे. या दलालांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. त्यामुळे यापुढे आता शेतकऱ्यांच्या मर्जीशिवाय कोणीही काहीही करु शकणार नाही, असे मोदी म्हणाले.