नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानला गुरुवारी जबरदस्त दणका दिला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून बीएसएफने केलेल्या धडक कारवाईत 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून, त्यांच्या चार चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराने मात्र भारतावर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सीमा भागातील गावांतील दोन नागरिक ठार तर अनेक नागरिक जखमी झाल्याचा आरोप केला आहे. सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने काल शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. त्यात बीएसएफचे हेडकॉन्स्टेबल आर. पी. हजरा शहीद झाले होते. वाढदिवसाच्याच दिवशी त्यांना प्राण गमवावा लागला होता. त्यांच्या मृत्यूचा बदला बीएसएफ जवानांनी 24 तासांच्याआत घेतला. ’एकाच्या बदल्यात दहा’ या सूत्रानुसारच त्यांनी 10 ऐवजी एक डझन पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचे सांगण्यात आले.
मेजरच्या मृत्यूचा बदला घेतला!
बीएसएफने केलेल्या धडक कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या मोर्टार नष्ट झाल्या असून, पाकिस्तानी चौक्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे बीएसएफचे महानिरीक्षक रामावतार यांनी सांगितले. अर्थात, या कारवाईत पाकचे सैनिक मारले गेले किंवा नाही, याबाबत त्यांनी कुठलाही खुलासा केला नाही. गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराच्या कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी भागात घुसून कारवाई केली होती. पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमने केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. त्यांच्या मृत्यूचा बदला लष्कराने घेतला होता. चार दहशतवादी तळ आणि दोन पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करून हे वीर परतले होते. आताही सांबा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी बीएसएफच्या तुफान गोळीबारात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झालेत.
अंदाजे अचूक गोळीबार अन् काम फत्ते!
बीएसफच्या जवानांनी पाकिस्तानकडून करण्यात येणार्या उखळी तोफांच्या मार्याचा दिशेचा अंदाज घेतला आणि त्या दिशेने जोरदार गोळीबार केला. बीएसएफच्या जवानांचा अंदाज खरा ठरल्यामुळे हा मारा अचूकपणे झाला. त्यामध्ये पाकिस्तानी बंकर्सच्या जवळपास असणारी सोलार पॅनल्स आणि अन्य शस्त्रे उद्ध्वस्त झाली. त्यांच्या बंकर्सचेही मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती जम्मू बीएसएफचे महासंचालक रामावतार यांनी दिली. ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बीएसएफच्या जवानांनी केलेल्या या गोळीबारात 12 ते 13 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. जम्मू-काश्मीरच्या राजबाग परिसरात काल रात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल आर. पी. हाजरा शहीद झाले होते. हाजरा यांचा काल वाढदिवस होता. त्यामुळे भारतीय जवान पेटून उठले आणि त्यांनी त्वेषाने गोळीबार करत पाकिस्तानला नामोहरम केले.
नवीन वर्षात पाकड्यांच्या कुरापती सुरुच!
गेल्या वर्षभरात पाकिस्तानने 800 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, 2018 च्या सुरुवातीलाही पाकच्या कुरापती सुरुच आहेत. 23 डिसेंबररोजी केरी सेक्टर येथे पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात 3 जवान शहीद झाले होते. यामध्ये भंडार्याचे सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश होता. पाकच्या गोळीबारात गेल्या वर्षभरात सैन्याचे 14 जवान, 12 नागरिक आणि बीएसएफच्या 4 जवानांनी जीव गमावला होता. बीएसएफकडून काही घुसखोरांना मारण्यात जवानांना यश मिळाले आहे. त्यामुळे एकीकडे पाकिस्तानचा गोळीबार आणि एकीकडे घुसखोर्यांची घुसखोरी यामुळे सध्या जवानांची तारेवरची कसरत सुरु आहे.