…पुन्हा होणार ‘सायकलीं’चे शहर!

0

पुणे । एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून पुण्याची ओळख होती. हीच ओळख पुन्हा अधोरेखित करण्यासाठी नव्या सायकल आराखड्यात तब्बल 834 किलोमीटरचे सायकल मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सुमारे 1 लाख सायकली शहरात धावू शकणार आहेत. त्यांच्यासाठी 5 हजार सायकल स्टेशन आणि काही हजार सायकल तळ तयार करण्याचे नियोजन आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील अनेक रस्त्यांवर सायकल ट्रॅक उभारण्यात आले. मात्र, त्यातील बहुतांश सध्या निरुपयोगी आहेत. नव्या सायकल योजनेची तशीच गत होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तीन वर्षांच्या कालावधीसाठी या प्रकल्पाला 335 कोटी रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे. महापालिकेने एका खासगी कंपनीकडून हा सायकल शेअरिंगचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे अनुदानही पालिकेला मिळाले आहे. पुण्याचे सायकलवैभव परतून आणण्याची हमीच या प्रकल्प अहवालात देण्यात आली आहे. तो वाचूनच सायकलींच्या देश-परदेशातील पाच कंपन्यांनी महापालिकेकडे हे काम करण्याची इच्छाही लेखी स्वरूपात व्यक्त केली आहे.शहराचा मध्यवर्ती भाग सायकल व पादचारी स्नेही करण्यासाठीही काही उपाय सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील विशिष्ट रस्ते मोटार व दुचाकीमुक्त करावेत. मध्यवर्ती भागाभोवती वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित करावा व त्यावर वाहतूक होऊ देऊ नये, जुन्या इमारती, शाळा, मोकळी मैदाने यामध्ये सायकल तळासाठी प्राधान्य द्यावे, रस्त्यांवरही एका बाजूने पूर्ण सायकलतळ ठेवावा असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

सायकल झोनची निर्मिती
शहरात विविध ठिकाणी सायकल झोन तयार करण्यात येणार आहेत. सायकल देण्याघेण्याचे व्यवहार या झोनमधून होतील. त्यासाठी तिथे स्वतंत्र व्यवस्था असेल. वाहतूक पोलिस, आरटीओ यांची मदत यासाठी घेण्यात यावी. सायकल शेअरिंग योजनेतील सायकलींशिवाय झोनमध्ये खासगी सायकलीही ठेवण्याची मुभा असेल. दुचाकी किंवा अन्य वाहनांना मात्र तिथे मनाई असेल.

‘मी कार्ड’ काढणार
सायकल वापरासाठी प्रत्येक वेळेला सुटे पैसे वगैरे द्यावे लागणार नाहीत. महापलिका त्यासाठी स्वतंत्र मी कार्ड तयार करणार आहे. हे कार्ड वापरले की त्यातून पैसे चुकते होतील. तसेच सायकलला असलेले कुलूप हेच सुरक्षा कुलूप आहे. संपूर्ण स्वयंचलित असलेली डॉकलेस यंत्रणा त्यासाठी वापरण्यात येणार आहे. यात स्मार्टफोन किंवा त्यासारख्या तंत्राच्या सहाय्यानेच कुलूप उघडता येते.