काही अपवाद वगळले तर पावसाळ्यात मुंबईत दरवर्षीच पाणी तुंबते. हिंदमात, परळ, दादर आणि लालबाग या परिसरात पावसाचे पाणी हमखास तुंबते आणि मुंबईकरांचे हाल होतात. मग, सुरुवात होते ती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नावाने बोटे मोडण्याची. कुणी म्हणते नालेसफाई व्यवस्थित झाली नाही म्हणूनच पाणी तुंबले. कुणी म्हणते नालेसफाईत भ्रष्टाचार झाला. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेवर या काळात अशाप्रकारचे असंख्य असे आरोप नेहमीच होतात. प्रत्येकजण महापालिकेच्या नावाने शंख करतो. केवळ नालेसफाईसाठी आणि संबंधित कामांसाठी येथे शेकडो कोटी खर्च होतात, अशा या मोठ्या महापालिकेला दरवर्षीच पाणी तुंबल्यानंतर आरोपांना सामोरे जावे लागते.
सत्ताधारी शिवसेनेची अवस्था तर या काळात खूपच अवघडल्यासारखी होते. खरेच मुंबईत निर्माण होणार्या पूरस्थितीला शंभर टक्के मुंबई महापालिकाच जबाबदार आहे का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. नालेसफाई, मिठी नदीची सफाई ही कामे व्यवस्थित केली जात नाहीत हे मान्य. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमध्ये तथ्यही असू शकते. पण, महापालिका शंभर टक्के जबाबदार नाही हेदेखील तितकेच खरे. मुंबईच्या भौगालिक व नैसर्गिक स्थितीचासुद्धा त्यासाठी विचार होणे आवश्यक आहे. एका बेटावर वसलेले हे आवाढव्य शहर. समुद्राला येणार्या भरतीओहोटीचादेखील येथे पाणी तुंबण्याशी थेट संबंध आहे. धो-धो कोसळणारा पाऊस आणि भरती, अशी वेळ जुळून आली की, पावसाचे पाणी जाण्याचा मार्गच बंद होतो आणि मुंबई हमखास जलमय होते. आता यास महापालिका काय करणार किंवा शिवसेना तरी काय करणार. समजा भाजपला मुंबई महापालिकेची एकहाती सत्ता मिळाली, तर अशा परिस्थितीत मुंबईत साठणारे पाणी भाजप काय थेट वाळवंटात नेऊन सोडणार आहे का? मुंबईतील या समस्येची तीव्रता उपाययोजनांद्वारे नक्की कमी होऊ शकते. 26 जुलै 2005 ला मोठा फटका बसल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे विचार व्यक्त केले पण, काही दिवस जाताच त्याप्रसंगाचे गांभीर्य कमी झाले.आपल्याकडे हे प्रत्येक बाबतीत होते. मुंबईतील पुराचा प्रश्न असो की, दहशतवादी हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी करण्यात येणार्या उपायोजनांचा प्रश्न असो. दुर्घटना घडली की, काही दिवस त्याचे कवित्व सुरू असते आणि त्यानंतर सर्वजण ती घटना विसरून जातात. त्यानंतर पुन्हा पुढील आपत्तीची वाट पाहिली जाते. यावेळेसही मुंबईतील पूर परिस्थितीने बळी घेतले. 26 जुलैच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी नागरिकांचा बळी जाणे खूप मोठी घटना आहे. ज्यांचे बळी गेले आहेत, त्या नागरिकांना राज्य सरकारने नुकसानभरपाई देऊन त्या कुटुंबांना बसलेला आघात थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा. शासनाची ती जबाबदारीच आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे चोख, प्रामाणिकपणे केली तर मुंबई कधीच तुंबणार नाही, असे छातीठोक कुणी म्हणेल का? सुज्ञ मुंबईकरांनाही याबाबतची सत्यस्थिती माहिती आहे. कदाचित त्यामुळेच मुंबई महापालिकेवर सातत्याने शिवसनेचा भगवा फडकत असावा. परंतु, महापालिकेने आपली जबाबदारी चोख बजावलीच पाहिजे हेदखील तितकेच खरे. मुंबईतील पावसाचे प्रमाण हेदेखील येथे सातत्याने तुंबणार्या पाण्याचे एक कारण आहेच.
बाँबस्फोट, अतिरेकी हल्ला असो की, मुंबईतील पूर असो, मुंबईकर नेहमीच अशा आपत्तींना समर्थपणे तोंड देत आला आहे. यावेळेसही मुंबईकरांचे ते धैर्य दिसले आणि मनाचा मोठेपणाही दिसला. मनाचा मोठेपणा यासाठी की, पावसामुळे मुंबई ठप्प झाल्यानंतर हजारो नागरिक ठिकठिकाणी अडकले होते. त्यांना अन्न-पाणी आणि निवारा देण्यासाठी शेकडो हात पुढे आले. विशेष म्हणजे मुंबईतील पावसात अडकलेल्या नागरिकांसाठी चर्च, गुरुद्वारा, गणेश मंडळे, जैन संघ सरसावल्याचे दिसले. राष्ट्रीय एकात्मतेचे सुरेख दर्शन या लोकांनी अशा कठीण प्रसंगीही घडवले. या सर्वांचे अभिनंदन आणि सॅल्यूट! धर्म आणि जातीच्या नावावर समाज दुभंगतो की काय, इतपत शंका यावी, असे वातावरण सध्या असताना मुंबईकरांनी नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना घडवलेले माणुसकीचे हे दर्शन खरेच कौतुकास्पद! 26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे प्राण गेले. आजही मुंबईतील अनेक कुटुंबे त्याची झळ सोसत आहेत. घरातील कर्तापुरुषच गेल्याने त्यावेळी अनेक संसार उन्मळून पडले. आताही मुंबईतील पावसाने बळी घेतले आहेत. निसर्गाचा प्रकोप थांबवणे कुणाच्याही हातात नसले, तरी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो. त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, त्यासाठी मुंबईकरांवर आणखी एखादे संकट येण्याची वाट पाहू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मुंबईतील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबईकरांना धीर दिला. आता यापुढे केवळ मुंबई महापालिकेला दोष देत बसण्यापेक्षा महापालिका आणि राज्य सरकारने मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांना आमंत्रित करून एकत्रित ठोस प्रयत्न करावेत एवढीच अपेक्षा.