पुरंदर । पुरंदर तालुक्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खळद, शिवरी, वाळुंज, निळुंज परिसरात शेतकर्यांसमोर पाण्याच्याबरोबरच जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागातील नागरिक चारा, पाणी विकत घेत असल्याचे दिसते.
गेल्या काही वर्षांपासून या भागातील शेतकरी सतत दुष्काळाच्या छायेत असतो. या वर्षी हवामान खात्याच्या विविध अंदाजांनी शेतकरी सुखावला होता. चांगला पाऊस पडेल, या आशेवर पेरणीपूर्व मशागती करून, बी-बियाणे खरेदी करून खरिपाच्या हंगामासाठी सज्ज झाला होता. पण, हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवून पावसाने दडी मारली व शेतकर्यांची घोर निराशा झाली. खळद, शिवरी परिसरात खरिपाच्या केवळ 10 टक्के पेरण्या झाल्या व त्याही आता अडचणीत आल्या आहेत. या भागातही दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे दिसते. या भागाला पाणीपुरवठा करणारा पिलाणवाडी जलाशयही आटल्यामुळे येथील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाचे केवळ एक-एक टँकर या भागात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते. 100 रुपयांना एक हजार लिटर याप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
दुष्काळ जाहीर करा
आता आषाढ महिना संपल्याने पावसाची आशा धूसर झाली आहे. शेतकर्यांना पैसे मिळवून देणारा तसेच वर्षभर पुरेल एवढे धान्य, कडधान्य देणारा हा खरिपाचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. आता चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा व जनावरांच्या छावण्या, चारा डेपो सुरू करावेत, अन्नधान्याचा पुरवठा करावा व सरसकट नापेर अनुदान द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.