पुरंदरमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम

0

पुरंदर । शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मूल्यशिक्षणाला पूरक मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर सुरू करण्यात आला असून या उपक्रमानुसार पुरंदर तालुक्यातून निवडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांची 4 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शिवरीतील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयात पार पडली.

या प्रशिक्षण कार्यशाळेस पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सोनाली कदम, गटशिक्षणाधिकारी आर. एम. लोंढे, मूल्यवर्धन कार्यक्रम समितीचे जिल्हा अध्यक्ष रमेश नवलखा, महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाचे प्राचार्य शहाजी कोळेकर, मच्छिंद्र जाधव, नवनाथ बोरावके, दत्ता राऊत, नंदू नरते, निलेश ढाकले, दीपक नाझीरकर यांनी मार्गदर्शन केले. मूल्यांची आजच्या काळात खूप गरज आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात होण्याला खूप महत्त्व आहे. आणि ते संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे सांगत मूल्य ही लादली जात नाहीत. ती शिकवलीही जात नाहीत, त्यांचा स्वीकार हा स्वतः करावा लागतो. त्यासाठी त्या संबंधिच्या संधी शालेय स्तरावर उपलब्ध करून दिल्या. मुलांना प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. त्यांच्या विचारांना चालना मिळाली. योग्य व अयोग्य या गोष्टीत ते फरक समजू शकले. तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजण्यास मदत होईल, असे लोंढे यांनी सांगितले. तर या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्याची रुजवणूक होऊन मुले ही सुसंस्कृत, मूल्यनिष्ठ व देशाचे जबाबदार नागरिक घडतील. त्यांच्या हातून समाजहित व देशहिताची कार्य होतील, असा विश्‍वास शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे यांनी व्यक्त केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत, समाजात, घरी, बाहेरच्या व्यक्तींशी कसे वागायचे, कोणतेही काम कसे करायचे यासंदर्भातील ज्ञान मिळणार आहे. त्यासाठी शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका व विद्यार्थी उपक्रम पुस्तिकाही तयार करण्यात आलेल्या असल्याचे मूल्यवर्धन तालुका समन्वयक दीपक गर्जे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गर्जे यांनी केले. तर मूल्यवर्धन तालुका समिती अध्यक्ष गिरीश कर्णावट यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.