यवत । पावसाने ओढ दिल्याने पुरंदर उपसा सिंचनाच्या माध्यमातून गावांतील जलस्त्रोत भरून द्यावे. नाझरे धरणातून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली होती. नाझरे धरणावर 52 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या गावांचे जलस्रोत भरून देण्याची सुळे यांची मागणी त्यांनी मान्य केली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीत सुळे यांनी यावर चर्चा करण्यात आली.
टंचाईतून विजबिल माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या गावांनी मागणी केल्यास टँकर त्वरित मंजूर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राव यांनी यावेळी सांगितले. दौंड येथील कुरकुंभ मोरीच्या कामाबाबतही यावेळी चर्चा झाली. कुरकुंभ मोरीच्या कामाचा निधी शासनाने दौंड नगरपालिकेस वर्ग केला आहे. हे काम लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली. कुरकुंभ मोरीच्या कामासंदर्भात सुप्रिया सुळे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पुण्यात त्यांची भेट घेऊन याबाबत लक्ष घालून काम मार्गी लावण्याबाबत विनंती केली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जालिंदर कामठे, वैशाली नागवडे, इंद्रजीत जगदाळे, नगरसेवक साळवे उपस्थित होते.