छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने होणार विमानतळ
मुंबई : बऱ्याच दिवसांपासून लटकत पडलेल्या पुरंदर येथील नियोजित संभाजी महाराज विमानतळ प्रकल्पाला अखेर संरक्षण विभाची मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. तसेच तिथल्या जमीन अधिग्रहणाचे काम देखील लवकरच सुरु होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी याबाबतची मंजुरी असणारे पत्र महाराष्ट्र विमानतळ कंपनीला दिले आहे. पुरंदर विमानतळ झाल्यास हवाई दलाच्या उड्डाणांना अडचण निर्माण होईल, असा मुख्य आक्षेप लष्कराकडून घेण्यात आला होता.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी केली होती. तसेच हे विमानतळ तयार होऊन यावरून २०१९ मध्ये पहिले उड्डाण होईल असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. मात्र या आंतरराष्ट्रीय विमानतळाला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली नव्हती. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून संरक्षण मंत्रालयाकडून अनेक बाबी तपासण्यात आल्यानंतर संरक्षण विभागाचे उपसचिव संजय कुमार यांच्या सहीने महाराष्ट्र विमानतळ कंपनीला या प्रकल्पची मंजुरी असणारे पत्र पाठवण्यात आले आहे. पुणे विमानतळावर सैन्यदल आणि प्रवासी वाहतूक विमानाची गर्दी वाढल्याने नवीन विमानतळाची गरज निर्माण झाली आहे. या विमानतळांसाठी विमानतळासाठी सासवड, पुरंदर, जेजुरी या गावांसह सात गावातील जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. पुरंदर हे छत्रपती संभाजी राजे यांचे जन्मस्थान आहे. या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा केवळ 15 किलोमीटरवर आहे.
विमानतळाच्या जागेसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सहा ठिकाणी पाहणी केली व पुरंदर येथील जागेला पसंती दर्शविली. त्यामुळे हे विमानतळ पुरंदरला उभारण्याचे निश्चित केले आहे. पुणे विमानतळाच्या विस्ताराच्या मर्यादा लक्षात घेता पुरंदर येथील जागेला प्राधान्य देण्यात आले आहे. या विमानतळाला 2400 हेक्टर जागा लागणार असून चार किलोमीटरच्या दोन धावपट्ट्या बनविनयेत येणार आहेत. या विमानतळासोबतच पुणे आणि दक्षिणेकडील राज्यांना जोडणारे महामार्ग देखील विकसित करण्यात येणार आहेत. पुणे मुंबई बंगलोर कडून येण्यासाठी 8 मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आणि 17 ला जोडण्यासाठी स्वतंत्र रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे.