पुरंदर तालुका शालाबाह्य मूलमुक्त करा

0

गराडे । व्यवसायासाठी स्थलांतर करून आलेल्या मजुरांच्या प्रत्येक मुलाला शाळेत घालण्याचे काम करा. संपूर्ण पुरंदर तालुका शालाबाह्य मूलमुक्त करण्यासाठी वीटभट्टीचालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पुरदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी केले. सासवड (ता. पुरंदर) येथील तहसील कचेरी येथे चाळीस वीटभट्टीचालक व आशा प्रकल्पातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी गिरी बोलत होते. पोलिस उपनिरीक्षक संदीप गोसाावी, नायब तहसीलदार प्रमोद कोकरे, पत्रकार संतोष शेंडकर, पंचायत समितीच्यसा शिक्षण विभागाचे अनिल चाचर, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब देवकर उपस्थित होते.

200 मुले शालाबाह्य
बारामती, पुरंदरमध्ये स्थलांतरीत होणार्‍या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या आशा प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी पुरंदर तालुक्यातील 79 वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये दोनशेपेक्षा अधिक मुले शालाबाह्य असल्याचे समोर आले होते. याबाबत गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत वीटभट्टीचालकांची बैठक आयोजित केली होती.

वीटभट्टीचालकांवर लक्ष ठेवा
वीटभट्टीजवळच्या जिल्हा परिषद शाळा, विद्यालयांना अशी मुले सामावून घेण्याचे बंधन आहे. आपणास काही अडचणी वाटतील तेव्हा शिक्षण विभाग तुम्हाला मदत करेल. तलाठी, मंडल अधिकारी यांनी वीटभट्टीचालकांवर लक्ष ठेवावे, अशा सूचना गिरी यांनी यावेळी दिल्या. स्थलांतरीत मुलांना दाखल्याशिवाय कुठलेही शुल्क न घेता वयानुरूप प्रवेश मिळतो, अशी माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने अनिल चाचर यांनी दिली. गावकामगार तलाठी संघटनेचे तालुकध्यक्ष बापूसाहेब देवकर यांनी या विशेष उपक्रमास सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.