सासवड : एकीकडे वारंवार खंडीत होणार्या वीजेमुळे पुरंदर तालुक्यातील जनता त्रस्त झालेली असतानाच दुसरीकडे आकडे टाकून वीज चोरणार्या चोरट्यांच्या सुळसुळाट झाला आहे. या वीजचोरीचा भुर्दंड सामान्यांना बसत असून त्यांच्याकडून बिलाची वसुली केली जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांच्या कामावरच शंका निर्माण होऊ लागली आहे. सणासुदीच्या व परीक्षांच्या काळामध्ये लोडशेडिंगचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला होता.
कारवाई करण्यास टाळाटाळ
प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी विजचोरीची तक्रार करण्यास ग्रामस्थ गेले असता त्यांनाच अशी विजचोरी होते काय? असल्यास आम्हास दाखवा, असे म्हणून कर्मचारी टाळत आहेत. त्यामुळे विजचोरी करणारे सराईत झाले असून हे सर्व स्थानिक सत्ताधारी पुढारी असल्याचे दिसून येत असल्याने यांची कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. दिलेल्या तारखेपूर्वी बिल न भरल्यास वीज जोड तोडण्याची धमकी कर्मचारी देतात. मात्र, राजरोसपणे वीजवाहक तारेवर आकडे टाकून लाईट चोरी करणार्यांची मात्र केबल ही काढली जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दंड वसूल करणार
महावितरणच्या सासवडसह पुरंदर तालुक्यातील वाघापूर, राजेवाडी, माळशिरस, सिंगापूर, पारगाव कुंभारवळण आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री चालक, हॉटेल व्यावसायीक, वाळू धुणारे वीज वाहक तारांवर आकडे टाकून वीज चोरी करताना दिसून येत आहेत. याबाबत महावितरणच्या सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे म्हणाले की, यापूर्वीच्या काळातही वीजचोरी करणार्याविरुद्ध महावितरणने कठोर कारवाई केली आहे व यापुढील काळात देखील अशा वीज चोरांविरुद्ध कारवाई करून जास्तीत जास्त दंड वसूल केला जाईल.