पुणे । जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र पुरेसा पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील पुरंदर, दौंड आणि बारामती तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन 97 हजार 942 नागरिकांना 45 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणी टंचाईची शक्यता
पावसाळा अजून संपला नसला तरी जिल्ह्यातील पूर्व भागात पाणीटंचाईचा लोकांना सामना करावा लागत असल्याने पावसाळ्यानंतर पाणी टंचाईची भयावह परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
तीन तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा
सध्या जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी तीन तालुक्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचत असून पुरंदर तालुक्यात 26 टँकर सुरू आहेत. तर बारामती तालुक्यातही 17 आणि दौंड तालुक्यात 2 टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली. पुरंदर तालुक्यातील 12 गावे आणि 177 वाड्यांवरील 51 हजार 932 नागरिकांना 26 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ तर बारामती तालुक्यातील 15 गावे आणि 154 वाड्यांमधील 42 हजार 895 नागरिकांना 17 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर दौंड तालुक्यातील दोन गावे आणि आठ वाड्यांवरील 3115 नागरिकांना दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा एकूण जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 97 हजार 942 नागरिकांना 45 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.