पुणे । पुरंदर येथे प्रस्तावित असलेले विमानतळ तसेच लोहगाव विमानतळारील विमानांना कोणताही अडथळा येत नाही. पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार येथील विमानतळाची धावपट्टी, उड्डाणाची दिशा योग्य आहे, असा अहवाल एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने संरक्षण विभागाला दिला आहे. त्यामुळे या अहवालाचे विश्लेषण करून अंतिम निर्णय संरक्षण विभाग घेणार आहे.
याविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले की, एअरपोर्ट अॅथॉरिटीने आपला अहवाल संरक्षण विभागाकडे मागील 20 दिवसांपूर्वीच सादर केला आहे. लोहगाव आणि प्रस्तावित पुरंदर विमानतळाचे अस्तित्व राहू शकते. दोन्ही विमानतळावरून एकाचवेळी विमानाने उड्डाण केल्यास काही अडथळा दिसत नाही. पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार विमानतळाचा रनवे आणि फ्लाईंग झोन योग्य आहे. आता या अहवालाचे संरक्षण विभागाकडून विश्लेषण केले जात आहे. संरक्षण विभागही याबाबत सकारात्मक आहे. संरक्षण विभाग यावर अंतिम निर्णय घेणार आहे.
15 दिवसांत अहवाल सादर करा
दरम्यान मागील संरक्षण मंत्रालयाच्या तांत्रिक समितीचे अधिकारी, एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अहवालावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या अहवालात काही किरकोळ सुधारणा सुचवून येत्या पंधरा दिवसात पुन्हा तो सादर करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने एअरपोर्ट अॅथॉरिटीला दिले होते.
तांत्रिक समितीची बैठक
संरक्षण विभागाने सुरक्षितता आणि लोहगाव व पुरंदर येथील विमानतळावरून विनाअडथळा विमान उड्डाणासह काही तांत्रिक अडचणीसंदर्भात एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून अहवाल मागविला होता. यासंदर्भात मागील महिन्यात दिल्ली येथे तांत्रिक समितीची बैठक झाली. या बैठकीत किरकोळ बाबींची पूर्तता करून येत्या पंधरा दिवसात पुन्हा अहवाल सादर करावा, अशा सूचना या समितीने एअरपोर्ट अॅथॉरिटीला संरक्षण विभागाने दिल्या होत्या.
प्रस्तावात त्रुटी
विमानतळासाठी शासनाने पुरंदर येथील जागा निश्चित केली आहे. पुरंदर विमानतळासाठीचा प्रस्ताव शासनाने संरक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया कडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात संरक्षण मंत्रालयाने काही त्रुटी काढल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांच्या तीन-चार बैठका झाल्या. आणीबाणीच्या वेळेस पुरंदर येथील विमानतळामुळे लोहगाव विमानतळावरून लष्कराच्या विमान उड्डाणास काही अडथळे निर्माण होऊ शकतात का, अशी शंका संरक्षण मंत्र्यांकडून उपस्थित करण्यात आली होती. त्यावर यासंदर्भात अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने दिले होते.
…म्हणून रखडली बैठक
नियोजित विमानतळावरील धावपट्टी समांतर ठेवणे, आणीबाणीच्या परिस्थितीत लोहगाववरून लष्करी विमानांचे उड्डाण करताना पुरंदर विमानतळावरून उडणार्या विमानांचा कोणताही अडथळा होणार नाही. लोहगाव विमानतळाची असलेल्या धावपट्टीला समांतर अशी पुरंदर विमानतळाची धावपट्टी करणे अथवा ही धावपट्टी 15 अंशात डावीकडे अथवा उजवीकडे वळविण्या संदर्भातील शिफारसही या अहवालात होती. मात्र संरक्षणमंत्र्यांना वेळ मिळत नसल्यामुळे ही बैठक होऊ शकत नव्हती.